गंमत - अंतोन चेखव

  • गंमत   ( शुत्चका) 
- अंतोन  चेखव
 
        हिवाळ्यातील ती एक लख्ख सुर्यप्रकाशाची  दुपार होती. बर्फवृष्टी जोरात चालूच होती. नादीन्काच्या कुरळ्या केसांची चंदेरी लट तिच्या गालावर वाऱ्यासोबत झुलत होती, तर तिच्या वरच्या ओठावर हिमकणांचा सफेद थर साचला होता. तिने माझ्या खांद्याला धरलं होतं. ज्या उंच टेकडीच्या कड्यावर आम्ही उभे होतो तिथून खाली पायथ्यापर्यँतचा उतार त्रीव्र होता. त्या उतारावर साचलेल्या बर्फात सुर्य अगदी आरश्यात प्रतिबिंबीत झाल्याप्रमाणे चमकत होता. एक छोटी स्लेजगाडी आमच्या जवळ तयार उभी होती. 
" नदेझ्दा पित्रोव्हना , चल आपण स्लेजगाडीतून खाली जाऊ!" मी तिला विनंती केली, " केवळ एकदाच ! तुला खात्री देतो, आपल्याला कोणतीही इजा होणार नाही."
पण नादीन्का अगोदरच भयभीत झाली होती. तिच्या हिवाळी बुटांपासून टेकडीच्या तळापर्यंत पसरलेला सगळा  बर्फाच्छादित उतार तिला जणूकाही एका मोट्ठ्या भयानक दरीसारखा भासत होता. मी जेव्हा तिला स्लेजगाडीत बसण्यास सुचवलं तेव्हा तर ती खूपच घाबरली. उताराकडे पाहुन  तिने अगदी श्वासच रोखून धरला. पण खरचं, जर तिने कड्यावरून स्लेजगाडीतुन खाली जाण्याचं ठरवलं, तर काय होईल बरं ? ती वेढी होईल, भीतीने मरून जाईल अक्षरशः ! 
" चला आपण स्लेज मधून खाली जाऊ !" मी म्हटलं, "इतकं भिण्याची गरज नाही! हा निव्वळ भेकडपणा आहे!"
शेवटी नादीन्काने होकार दिला, पण त्या होकारात जीवनाच्या शाश्व्तीबद्दल भीती होती. मी तिला स्लेजमध्ये बसवलं, तिचा चेहरा पांढरा पडला होता, अंग थरथरत होतं. मी माझा हात तिच्या कमरेभोवती टाकला व  तिच्यासोबत स्वतःला स्लेजगाडीतुन बर्फाळलेल्या दरीत झोकून दिलं. 
      आमची स्लेजगाडी बंदुकीतील गोळीच्या वेगाने सुसाट घसरत होती. जोराचा कापरा वारा आमच्या तोंडावर ठोसे मारू लागला, कानात कर्कश शीळ घालू लागला, रागाने निर्दयीपणे आमचे चिमटे काढु लागला ; त्याला आमची डोकी धडावेगळी करायची होती. वाऱ्याच्या अशा असह्य्य माऱ्यामुळे आम्हाला अगदी श्वास घेणं देखील अवघड झालं होतं. असं वाटत होतं कि एखादा राक्षस आम्हाला जखडून, नरकामध्ये फरफटत ओढून नेत आहे. भवतालच्या सर्व गोष्टी एकमेकांत मिसळून त्याची एक मोट्ठी न संपणारी, धावत्या पट्ट्यांची मालिका तयार झाली 
होती. बस्स.. आणखी एखादा क्षण..अन वाटलं कि संपलंचं सगळं, आमचा मृत्यु !
"नाद्या, माझं तुझ्यावर प्रेम आहे !" मी हळुच म्हटलं. 
आता स्लेजचा वेग थोडा कमी झाला होता, वाऱ्याच घोंघावणं मंदावलं होतं, स्लेजच्या लोखंडी पट्ट्यांचा कर्कश आवाज तितकासा भीतीदायक राहिला नव्हता, श्वासोश्वास पुर्ववत होत होता. व एकदाचं आम्ही टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो. परंतु नादीन्काचा अजूनही जीवात जीव नव्हता, तिचा चेहरा तसाच पांढराफट्ट होता, ती जोरजोरात श्वास घेत होती. स्लेजमधुन उतरण्यासाठी मी तिला मदत केली. 
" आता पुन्हा कधीही मी स्लेजमधुन अशी सवारी करणार नाही."  माझ्याकडे बघत ती म्हणाली. तिच्या विस्फारलेल्या डोळ्यांत केवळ भीती दिसत होती. " जग इकडचं तिकडं झालं तरी मी काही पुन्हा स्लेजमध्ये बसणार नाही! अगदी जीवच जात होता माझा!"
    थोड्या वेळाने ती हळुहळु भानावर आली आणि सांशक नजरेने माझ्या डोळ्यांत पाहू लागली ; खरचं का मी ते चार शब्द उच्चारलेत ? का घोंघावत्या वाऱ्यात तिला तसा भास झाला ? मी मात्र तिच्या शेजारी उभं राहून सिगारेट ओढत हातातील ग्लोव्हज निहाळत होतो.    
    तिने माझ्या खांद्याला धरलं, व आम्ही तिथुन बराच वेळ टेकडीजवळ भटकत राहिलो. वरवर ती शांत दिसत असली तरी स्पष्ट जाणवत होतं की ते कोडं तिच्या मनाला शांत बसू देत नव्हतं. ते तिच्यासाठी आता महत्वाचा प्रश्न बनला होता. प्रश्न- अभिमानाचा, आत्मसम्मानाचा, अत्यानंदाच्या! प्रश्न जीवन मारण्याचा, जगातील सर्वात महत्वाचा प्रश्न ! नादीन्का मायूस होऊन अधीरतेने माझ्या तोंडाकडे बघत होती, तिची शोधक नजर मला प्रश्न विचारत होती. मी विचारलेल्या प्रश्नांना ती असंबंध उत्तरे देत होती. मी कधी एकदा त्या विषयावर बोलायला सुरवात करतो याची ती वाट पाहत असावी. काय सुंदर भावनांचा कल्लोळ होता त्या नाजुक चेहऱ्यावर ! मला जाणवलं कि स्वतःशीच झगडत होती, तिला काहीतरी सांगायचं होतं, कशाबाबत तरी विचारायचं होतं. पण शब्दच सापडत नव्हते तिला. एकीकडे अडचण पण वाटत असावी तर दुसऱ्या बाजूने भीती ! मनापासून झालेला आनंद तिला बोलण्यापासून परावृत्त करीत होता. 
" तुला एक सांगु का ?" माझ्याकडे बघायचं टाळुन ती म्हणाली. 
" काय ?" मी विचारलं. 
" चल, आणखी एकदा आपण स्लेजची सवारी करू व खाली येवु ."
        आम्ही टेकडी चढुन वर गेलो. मागील वेळेप्रमाणेच घाबरलेल्या भित्र्या नादीन्काला मी स्लेजमध्ये बसवलं, भीतीने तिचा चेहरा आतादेखील पांढरा पडला होता, ती थरथरत होतीच. स्लेजला धक्का देऊन आम्ही पायथ्याच्या दिशेने घसरु लागलो. पुन्हा एखादा तो वेगवान राक्षसी वारा घोंघावु लागला, स्लेजच्या पट्ट्यांचा कर्कश आवाज सुरु झाला. पुन्हा एकदा त्या वादळी थयथयाटाच्या सर्वोच्च क्षणी मी दबक्या आवाजात बोललो. 
" नादीन्का, माझं तुझ्यावर प्रेम आहे !"
      जेव्हा स्लेज तळाशी येऊन स्थिरावली तेव्हा नादीन्काने मागे वळून टेकडीच्या उतारावर एक नजर टाकली व नंतर माझ्या चेहऱ्यावर ती रोखून बराच वेळ मला पाहत राहिली.  माझ्या शांत-स्थिर आवाजात काहीतरी शोधण्याचा ती प्रयत्न करत होती. या क्षणाला तिचं सगळं शरीर- अगदी तिचं स्वेटर व मफ्लरदेखील- एकाच गोष्टीची साक्ष देत होतं - तिच्या मनातील प्रचंड गोंधळ ! तिच्या चेहऱ्यावर लिहलं होतं, 
'माझ्यासोबत काय घडतयं? कोण बरं ते शब्द माझ्यापर्यंत पोहचवत आहे? तो हे खरचं बोलला कि मला तसा भास झाला?'
ह्या प्रश्नांनी तिला त्रस्त केलं होतं, तिच्या संयमाची परीक्षा घेत होतं. 
 त्या बिचारीने माझ्या प्रश्नांची ऊत्तरे देणं थांबवलं, व चेहरा पाडून ती अगदी रडकुंडीला आली होती. 
" घरी परतलं पाहिजे ना आता?" मी विचारलं.
" मला... मला हि स्लेजची सवारी आवडायला लागली आहे. आपण आणखी एखादी फेरी घेऊ शकत नाही का?"
ती कितीही म्हटली असली कि तिला हि सवारी आवडायला लागली होती, तरी या वेळीदेखील ती मागील दोन्ही वेळेप्रमाणे भ्यालेली होतीच. तिच अंग कापत होतं, चेहरा पांढराफट्ट झाला होता नि श्वासोश्वास भीतीने अनियमित बनला होता. 
आम्ही तिसऱ्यांदा टेकडीवरून खाली घसरू लागलो. मी पाहिलं कि या वेळेस ती माझ्याकडे एकटक पाहत होती, माझ्या ओठांची हालचाल टिपत होती. परंतु मी तोंडाला रुमाल लावला व अधुनमधुन खोकु लागलो. जेव्हा गाडी उताराच्या मध्यावर पोहोचली, मी पटकन बोलुन मोकळं झालो - "नाद्या, माझं तुझ्यावर प्रेम आहे !"
    आणि ते रहस्य तिच्यासाठी रहस्यच बनुन राहिलं. नादीन्का अबोल झाली ; कसल्यातरी विचारांत गढुन गेली. मी तिला घरी सोडायला जात असताना ती धीम्या गतीने चालत होती. तिची पावलं ती आणखी मंदावत होती, वाट पाहत होती कि मी ते शब्द पुन्हा कधी उच्चारेन. मला स्पष्ट जाणवलं कि तिला आतून किती वेदना पडत होत्या. तिचा लढा स्वतःशीच चालला होता. स्वतःला ती समजावत होती,  'वारा माझ्याशी बोलला असेल असं असु शकत नाही ! मला तसं ते नकोय.'
      दुसऱ्या दिवशी माझ्या नावे एक चिठ्ठी आली. ' आज जर स्लेजच्या सवारीसाठी जाणार असशील तर मला देखील यायला आवडेल. - एन'.  आणि मग नन्तर त्या दिवसापासुन मी नादीन्कासोबत दररोज टेकडीवर स्लेजगाडीच्या सवारीसाठी जाऊ लागलो. नेहमीप्रमाणे कड्यावरून भरधाव खाली जाताना मी न चुकता दबक्या आवाजात ते शब्द उच्चारायचो. 
" नाद्या, माझं तुझ्यावर प्रेम आहे !"
      थोड्याच दिवसांत नादीन्काला त्या शब्दांची एखाद्याला जसं दारूचं व्यसन लागतं तशी सवयच जडली. त्या शब्दांशिवाय ती राहूच शकत नव्हती जणु. पुर्वीप्रमाणे अजूनही तिला स्लेजमधुन सवारी करताना प्रचंड भीती वाटायची, पण ती भीती व जीवावरील संकट यांनी त्या प्रेमाच्या शब्दांना एक वेगळं मोहक वलय प्राप्त करून दिलं होतं. परंतु हे हि खरं होतं कि ते शब्द तिच्यासाठी अजुनही तितकेच रहस्यमय व मन झुरवणारें होते. अजुनही संशयित गुन्हेगार दोनच होते- मी व तो वारा. आम्हां दोघांपैकी नेमकं कोण तिला प्रेमयाचना करीत होतं, हे अजुनही तिला कळत नव्हतं. पण आता तिला काही त्याची चिंता राहिली नव्हती. कोणत्या बाटलीतुन पिणं हे महत्वाचं नसुन, दारु नशा आणणारी असावी हे अधिक महत्वाचं!
एकदा असाच मी स्लेजची सवारी करण्याकरिता एकटाच बाहेर पडलो. गर्दीत मिसळत असताना मी पाहिलं कि नादीन्का टेकडीच्या पायथ्याशी उभी होती. तिचे डोळे मला शोधात असावेत बहुतेक. नन्तर ती घाबरत घाबरत  हळुहळु टेकडी चढु लागली. किती भ्यालेली होती ती तसं एकटीनेच जाताना! हिमवृष्टीच्या बर्फासारखी ती पांढरीफट पडली होती, तिचं अंग थरथरत होतं. मृत्यूस्तंभाकडे निघाल्याप्रमाणे ती चालत होती. पण ती मागे वळुन पाहत नव्हती. तिने बहुतेक ठरवलं असावं कि मी नसताना देखील ते गोड शब्द आपणाला ऐकू येतात का हे शोधुन काढायचं. मी पाहिलं कि तिच्या चेहऱ्याचा रंग कसा पालटला होता, भीतीने तिचं तोंड उघडच राहिलं होतं. तशीच ती स्लेजमध्ये बसली. डोळे मिटुन घेवुन जगाला प्रशायचे (अलविदा) म्हणुन तिने स्लेजचा प्रवास सुरु केला. 'झू..झू..' स्लेजच्या लोखंडी पट्ट्यांचा आवाज चालु झाला. नादीन्काला ते शब्द ऐकु आले असावेत का? मला माहित नाही. मी केवळ पाहिलं कि स्लेजमधुन बाहेर आल्यावर ती अधिकच निस्तेज व थकलेली होती. तिच्या चेहऱ्यावरून कोणीही सांगु शकलं असतं कि तिला ते शब्द ऐकु आलेत का नाही हे स्वतःलाच कळलं नव्हतं. स्लेजमधुन खाली येताना तिच्या मनातील भीतीने जणु तिची ऐकण्याची व समजण्याची ताकदच काढुन घेतली होती. 
    वसंत ऋतुचा मार्च उजाडला. वसंतातील सुर्य नेहमीसारखा आल्हाददायक होता. आमच्या बर्फाच्छादित टेकडीचा रंग आता गडद झाला होता, तिचं चकाकणं कमी कमी होत गेलं व शेवटी साचलेला बर्फ पुर्णपणे वितळला. स्लेजगाड्यांच्या सवाऱ्या लुप्त झाल्या. बिचाऱ्या नादीन्काला आता ते शब्द ऐकण्यासाठीची जागाच उरली नव्हती, त्यांचा उच्चार कऱणारही कोणी नव्हतं- तो कापरा वारा हिवाळ्यासोबत उडुन गेला होता आणि मी देखील सेंट पीटर्सबर्गला निघालो होतो. कदाचित कायमकरिता.
  त्यांनतर घडलं असं कि माझ्या प्रयाणाच्या एक दोन दिवसां अगोदर सायंकाळच्या वेळेस मी एका छोट्या बागेत बसलो होतो. बागेला लागूनच नादीन्काच्या घराचं अंगण होतं. मध्ये एक उंच लाकडी कुंपण होतं. बऱ्यापैकी थन्डी अजुनही जाणवत होती. हिमवृष्टीचे साचलेले लगदे जमिनीवर इकडे तिकडे पडले होते. झाडे गारठुन मेल्यासारखी उभी होती, पण हवेत मात्र वसंत ऋतुची चाहुल लागत होती. झोपण्याच्या तयारीत असलेले डोंबकावळे ओरडत होते. मी कुंपणापाशी गेलो व त्यामधील एका फटीतुन नादीन्काच्या घराकडे पाहत बसलो. थोड्या वेळाने नादीन्का घरातून बाहेर उंबरठ्यावर आली आणि तिने तिची दुःखी-कष्टी, आशाळभूत नजर आकाशाकडे रोखली. वसंताचा वारा सरळ तिच्या निस्तेज, मलुल चेहऱ्यावर मारा करत होता. त्याने तिला त्या वादळी वाऱ्याची आठवण करून दिली, जो आम्ही हिवाळ्यातील दिवसांत स्लेजमधुन टेकडीवरुन सवारी करताना वाहत होता. नादीन्काला त्यावेळी ऐकलेल्या त्या प्यारभऱ्या शब्दांचं स्मरण झालं. त्यासरशी तिचा चेहरा आणखीनच उदास झाला, तिच्या गालांवरुन अश्रुंचे थेंब ओंघळू लागले. आणि त्या बिचाऱ्या मुलीने दोन्ही हात आकाशाच्या दिशेने पसरले, ती जणु आकाशाला विनवत होती- मला ते शब्द पुन्हा ऐकु दे, त्यांना परत घेवुन ये मजपाशी. वाऱ्याची वाट न पाहता मी तिथुनच हळुवारपणे म्हटलं,  " नाद्या, माझं तुझ्यावर प्रेम आहे !"
बापरे ! काय बदल झाला तिच्यात !  आनंदाने ती जोरात काहीतरी ओरडली, तिच्या चेहऱ्यावर  मी पुर्वी कधीही न पाहिलेलं हास्य बघितलं. वाऱ्याची भेट घेण्यासाठी तिने दोन्ही हात क्षितीजाकडे पसरले. 
नादीन्का - आनंदी, हसरी, समाधानी ! 
    मी प्रवासाच्या तयारीसाठी निघुन आलो. 
     आता ह्या गोष्टीला बराच काळ लोटलाय. नादीन्का आता विवाहित आहे - स्वतःच्या मर्जीने का घरातल्यांच्या पसंदीने - याला फारसं महत्व नाही. तिचं लग्न उमरावांच्या इस्टेटीवर सेक्रेटरी म्हणुन काम करणाऱ्या व्यक्तीशी झालं, तिला तीन मुले आहेत. पण केंव्हातरी आम्ही दोघांनी मिळुन स्लेजगाडीतून सवारी केली होती व त्या घोंघावत्या वाऱ्याने तिच्या कानापर्यंत ' नादीन्का, माझं तुझ्यावर प्रेम आहे !' हे शब्द पोहोचवले होते, हि गोष्ट ती विसरलेली नाहीये. तिच्याकरिता आता हि आयुष्यातील सर्वात प्रेमळ, हृदयस्पर्शी व सुंदर आठवण बनुन गेली आहे. 
    पण आता, जेव्हा मी थोडा वयस्कर झालोय, मला स्वतःलाच कळत नाहीये - मी ते शब्द का उच्चारले होते ?  कशासाठी मी तिची गंमत करीत होतो ?. . 

मूळ रशियन लेखक - अंतोन चेखव
अनुवाद - इर्शाद बोरकर,
संशोधक सहाय्यक , इंग्रजी आधिविभाग, 
शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर.
irshadruss@gmail.com
७०२०८८७३५२
     

Comments

Unknown said…
It's interesting story...and you translate very well 👌🏻👍🏻
Happy art said…
Nice story.... Well translated 😊👍
Happy art said…
Nice story.... Well translated 😊👍
Unknown said…
Khup Chan story
Unknown said…
Khup Chan story
Dear Irshad, this translation is one of the finest examples of your unbelievable fascination for Russian literature. Translation is a very difficult task, especially when it comes to foreign language. I feel that original effect of a language cannot be translated. Since near synonyms and substitutes too share a very little amount of meaning, it is really challenging to locate a foreign language into one's mother tongue. However, your present article appears to be written originally in Marathi. This is obviously an outcome of your painstaking research and love for everything that is Russian. Congratulations for the commendable output. Best wishes for your further endeavours.
Nice story..very well translated
अतिशय उत्तम
Ajit Jadhav said…
अतिशय सुंदर..

Popular posts from this blog

आणि मार्क्स रशियात पोहोचतो..

Words matter!

'You will never learn the language...