गिरगिट - चेखव
गिरगिट - अंतोन चेखव
नवीन ओव्हरकोट घातलेला पोलीस इन्स्पेक्टर अच्युमेलव् हातात एक छोटं गाठोडं घेऊन बाजारातील चौकातून जात होता. त्याच्या मागून त्याचा मदतनीस हवालदार बास्केट घेऊन चालला होता, जे नुकतंच जप्त करून आणलेल्या गुजबेरीजनी काठोकाठ भरलं होतं. त्या चौकात सर्वत्र शांतता होती; तिथं कोणीच नव्हतं. दुकानांची व खानावळांची उघडी दारं जशी भूकवलेल्या नजरा रिकाम्या ताटाकडे बघतात तशी भकासपणे बाहेरील जगाकडे बघत होती. त्या दुकानांपाशी भिखारीसुद्धा नव्हती, सगळं चिडीचुप !
" चावतोस !! हरामखोर कुठला!" अचानक अच्यूमेलवला ऐकू आलं. "अरे अरे, सोडू नका त्याला, चावायला बंदी आहे आता. धरा! धरा! आ.. आई गं !! मेलो!!"
त्यानंतर कुत्र्याच्या किंकाळण्याचा आवाज ऐकू आला. अच्यूमेलवने आवाजाच्या दिशेने बघितलं. पिचुगीन नामक व्यापाराच्या वखारीतून एक लहान कुत्रं उडी मारून बाहेर पळत आलं. ते इकडे तिकडे बघत होतं. त्याच्यामागून कडक इस्त्रीचा कॉटनचा शर्ट घातलेला एक माणूस पळत बाहेर आला. त्याच्या जॅकेटची बटणे उघडी होती. तो कुत्र्याच्या मागे धावला व ताकदीने झेप मारून रस्त्यावर चक्क आडवं पडत त्याने त्या कुत्र्याला मागच्या पायांनी धरलं. त्यांनंतर आणखी एकदा कुत्र्याची किंकाळी ऐकू आली व त्यांनतर एक आरोळी- "सोडू नका!" ओस पडलेल्या दुकांनामधून आता पेंगुळलेली डोकी बाहेर येऊ लागलीत, व थोड्याच वेळात त्या लहानश्या वाखरीपाशी जणू जमिनीच्या पोटातुन अचानक बाहेर आल्यासारखी बघ्यांची गर्दी जमा झाली.
"साहेब काहीतरी लफडा झालाय."
अच्युमेलवने डाव्या दिशेने एक गिरकी घेतली आणि झपाझप पावले टाकत गर्दीच्या दिशेने जाऊ लागला. वखारीच्या फाटकापाशी त्याला तो वर नमूद केलेला माणूस दिसला. त्याच्या जॅकेटची बटणे उघडीच होती. उजवा हात उंचावुन तो गर्दीला रक्तानं माखलेलं बोट दाखवत होता. त्याच्या मद्यधुंद चेहऱ्यावर जणू लिहलं होतं , कुत्र्या, बघच आता कसा बदला घेतो. त्या माणसाला अच्युमेलवने ओळखलं; सोनार ख्रुकीन! या सर्व प्रकरणात दोषी असलेलं बॉर्जाय प्रजातीच, सफेद रंगाचं ते लहानसं कुत्रं गर्दीच्या मधोमध पुढचे दोन पाय पसरून बसलं होतं. त्याचा जबडा लहान पण तीक्ष्ण होता, पाठीवर एक पिवळसर डाग होता. त्याचं शरीर थरथर कपात होत व रडकुंडीला आलेल्या त्याच्या डोळ्यांमध्ये भीती व वेदना साफ दिसत होती.
" का जमलाय तुम्ही सगळे इथं?" गर्दीतून वाट काढत अच्युमेलवने विचारलं, " काय चाललयं काय इथं? ए,तू,बोट कोणाला दाखवतोयस? कोण ओरडलं ते मगाशी?"
" साहेब, मी आपलं गपगुमान चाललो होतो बघा." हाताची मुठ तोंडाकडे नेत,खोकत ख्रुकीन सांगू लागला, "दमित्री दमित्रीवीच सोबत जरा लाकडांबद्दल बोलत होतो तेवढ्यात हे नालायक कुत्रं काही कारण नसताना माझ्या हातावर झेपावलं आणि बोटाला चावलं. साहेब माफ करा,पण मी गरीब,काम करून पोट भरणारा माणूस आहे. माझं काम मेहनती पण नाजूक आहे. मला नुकसानभरपाई पाहिजे. कारण ह्या तुटलेल्या बोटासहित आता आठवडाभर तरी मला काही काम करता येणार नाही. साहेब, कायद्यात तरी असं लिहलेलं नाही कि प्राण्यांना चावा घेण्याचं स्वातंत्र आहे म्हणून. असं जर प्रत्येकाला कुत्री चावायला लागली तर अवघड आहे जगायचं-"
"हम्म, ठिकाय--" खोकत खोकत भुवया उंचावुन कडक आवाजात अच्युमेलव बोलला, " हे कुत्रं कोणाचं आहे रे? मी असं सोडणार नाही त्याला. कुत्र्यांना कसं मोकळं सोडायचं असतं ते दाखवतोच बरोबर! कायदा न पाळणाऱ्याना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. दंड केल्यानंतरच अक्कल येईल त्या शहाण्याला, कुत्री कशी पाळावीत ते. बरोबर दाखवतो! एलदिरिन," आपल्या सहकारी हवालदाराकडे पाहत अच्युमेलव म्हणाला,"कोणाचं कुत्रं आहे ते जरा माहित करून घे. मग रिपोर्ट तयार कर! आणि कुत्र्याला मारून टाक लगेच! कदाचित पिसाळलेलंसुद्धा असेल ते. मी विचारतोय, कोणाचं कुत्रं आहे हे?"
" असं वाटतंय कि बहुतेक हे जनरल झिगलोवचं कुत्रं आहे." गर्दीतुन एक आवाज बोलला.
" जनरल झिगलोवचं?? हम्म... एलदिरिन, जरा ओव्हरकोट काढ रे माझ्या खांद्यावरुन.... कसलं गरम होतयं! पाऊस पडणार वाटतं. तरीपण मला अजुन एक समजत नाहीये, तुला हे कुत्रं चावलंच कसं ?" ख्रुकीनकडे मोर्चा वळवत अच्युमेलव बोलू लागला, "तुझ्या बोटांपर्यंत ते पोहचुच शकत नाही. बघ किती लहान आहे ते आणि तु असा धिप्पाड! तुझं तुच कुठेतरी मोळा बिळा मारून घेतला असशील हातावर व नंतर सुचलं असेल कि चला सांगूयात, कुत्र्याने चावा घेतला म्हणुन, आरामात नुकसानभरपाई मिळेल. तुझ्यासारख्यांना मी काय ओळखत नाही काय! तुमची डोकी मला चांगली माहित आहेत. नालायकांनो, तुम्हासारख्यांना मी पाहताक्षणीच ओळखतो!"
" साहेब, त्याने गंमत करायची म्हणुन सिगारेटचं थोटुक ह्या कुत्र्याच्या तोंडावर टाकलं आणि मग कुत्र्याने बरोबर हिसका दाखवला. साहेब, बावळट माणूस आहे तो."
" खोटं बोलतोयस, आंधळ्या! काही बघितलंच नाही तर कशाला तोंड खुपसून खोटं बोलायचं माणसानं? साहेबांना डोकं आहे, त्यांना चांगलं कळतं कोण खोटं बोलतोय नि कोण देवासाक्ष ठेवून खरं बोलतोय. व जर का मी खोटं बोलत असेन तर याचा फैसला कोर्टाला करू देत. त्यांच्याकडे कायद्यात सगळं नमुद आहे... आता कायद्यापुढे सर्वजण समान आहेत... माझा सख्खा भाऊ गुप्त पोलीसदलात आहे... जर तुम्हांना जाणूनच घ्यायचं असेल तर.."
"वाद नको!"
" ह्यॅ! हे कुत्रं जनरलचं नाहीच मुळी! खूप विचारांती हवालदार एलदिरिन म्हणाला, "जनरलकडे असली कुत्री नाहीयेत. त्यांच्याकडची सगळी लांब केसांची आहेत."
"तुला हे पक्क माहित आहे का?"
"हो साहेब.."
" मला सुद्धा माहितेय. जनरलकडची कुत्री महागडी व उत्तम प्रजातीची आहेत. आणि हे कुतरडं...उकिरड्यावरचं! केसं नाहीत नि जरासुद्धा शेप नाही..भिकारडं! आणि असलं कुत्रं जनरलकडे?! डोकं आहे का ठिकाणावर? मॉस्को किंवा पिटर्सबर्गमध्ये असल्या कुत्र्याचं काय केलं गेलं असतं माहित आहे का? कायदा बियदा बाजूला सारून सरळ ताबडतोड ठार मारलं असतं त्याला! ख्रुकीन,तुझं नुकसान झालं आहे त्यामुळे हा मामला तु इथेच सोडून देऊ नकोस... चांगलाच धडा शिकवायला हवा! वेळ झालीये असल्या.."
" अं, बहुतेक जनरलचंच आहे वाटतं" आणखी विचार करत पोलीस शिपाई मोट्ठ्या आवाजात बोलला, "त्याच्या तोंडावर तसं काही लिहलेलं नाहीये, पण अलीकडे मी असलंच एक कुत्रं जनरलच्या अंगणात बघितल्याचं मला आठवतंय."
"जनरलचंच आहे, शंकाच नाही." गर्दीतुन एकजण बोलला.
"हं ! एलदिरिन, जरा ओव्हरकोट घाल रे माझ्या खांद्यावर... वाऱ्याचा जोर वाढतोय. त्यात अगोदरच थन्डी आहे आज. तू ह्या कुत्र्याला जनरलकडे घेऊन जा आणि चौकशी कर.सांग त्यांना कि अच्युमेलवला सापडलं व त्याने पाठवलं आहे म्हणुन.. आणि हे पण सांग कि कुत्र्यांना असं रस्त्यांवर बाहेर सोडू नका. हे कुत्रं जरा महागडं दिसतंय, जर प्रत्येक उपटसुंभ ह्याच्या तोंडावर सिगारेटी फेकायला लागला तर ते मरून जाईल बिचारं! कित्ती नाजुक आहे ते! आणि तु , बेअकली, तो हात खाली घे पहिला! तुझं ते फालतु बोट जगाला दाखवायचं काही कारण नाहीये. चुकी तुझीच आहे."
" तो बघा,जनरलचा कुक चालला आहे. त्यालाच विचारू काय ते. अरे ऐ प्रखोर! मित्रा ,जरा इकडे ये ना! बघ जरा ह्या कुत्र्याकडे.. तुमचं आहे का?
"आमचं कुत्रं !! शप्पथ, असली आमच्याकडे कधीच नव्हती!"
"तर विषय संपला, लांबट नको." अच्युमेलव मोठ्याने बोलायला लागला, "हे भटकं कुत्रं आहे! त्यात वाद घालण्यासारखं काही नाही. एकदा म्हटलं ना भटकं आहे, तर भटकं! ठार मारून टाकायचं व मामला संपला!"
" हे आमचं कुत्रं नाहीये," प्रखोर सांगु लागला," हे जनरलच्या भावांचं कुत्रं आहे, ते काही दिवसांपूर्वीच आमच्याकडे आले आहेत.आमची कुत्री शिकारी नाहीत. जनरलचे भाऊ शिकारी.."
" काय सांगतोस काय? जनरलचे भाऊ आले आहेत! व्लदिमिर इव्हानीच?" अच्युमेलवने विचारलं. त्याचा चेहरा आनंदाने फुलला होता. "काय मस्त बातमी दिलीस! मला माहितीचं नव्हतं! राहणार आहेत ना बरेच दिवस?"
"हो तर, राहणार आहेत."
"छान! माहितीचं नव्हतं बघ, दोघा भावांना एकमेकांशिवाय रहावलंच जात नाही! म्हणजे हे कुत्रं त्यांचं आहे तर! बरं झालं, खूप आनंद झाला... घेऊन जा त्याला... किती गोंडस आहे हे पिल्लु ... खूपच चपळ! ह्याच्या बोटाला चावलं म्हणे! हा हा हा!! हं , चल,असं थरथरतोयस का? राग आलाय मुर्खाला.. किती गोंडस कुत्र्याचं पिल्लु आहे!"
प्रखोरने हाक मारून कुत्र्याला बोलवलं व त्याला घेऊन तो त्या वखारीच्या गेटपासुन निघून गेला. जमलेली गर्दी ख्रुकीनवर हसु लागली.
" अजून तुला बघेनच मी!" अच्युमेलवने ख्रुकीनला धमकावलं, ओव्हरकोटमध्ये स्वतःला लपेटून घेतलं व बाजाराच्या चौकातुन चालु लागला.
मूळ रशियन लेखक - अंतोन चेखव
अनुवाद - इर्शाद बोरकर,
संशोधक सहाय्यक , इंग्रजी आधिविभाग,
शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर.
irshadruss@gmail.com
७०२०८८७३५२

Comments
Congratulations for yet another excellent piece of translation! It seems that you have mastered the art. Your keen interest coupled with passion produces the output with minute details that perfectly matches intention and original meaning. Although, a very difficult task, there is no compromise and violation of original effect that matters the most in any translation.
Best wishes!