जीवनातील एक क्षुल्लक प्रसंग- चेखव

जीवनातील एक क्षुल्लक प्रसंग

- अंतोन चेखव


        निकोलाय बेल्याईव ही सेंट पीटर्सबर्ग मधील एक श्रीमंत हस्ती होती. शहराच्या मध्यभागी त्याची स्वतःची एक टुमदार हवेली होती. खात्यापित्या घराण्यातील बत्तीस वर्षीय हया उमद्या, गुलाबी- गुबगुबीत गालांच्या मनुष्याला घोड्यांच्या शर्यतीचा दांडगा शौक होता. एके संध्याकाळी तो तिच्या मैत्रिणीच्या – ओल्गा इवानोव्हनाच्या - घरी आला. ओल्गा देखील उच्चभ्रू खानादानातून होती. तिच्यासोबत तो जवळपास राहातच होता म्हणानात. किंवा निकोलायच्याच शब्दांत सांगायचं म्हंटल तर त्याचं लांबलेलं, कंटाळवाणं प्रेमप्रकरण कसंतरी ढकलत होता. या प्रेमभरया कादंबरीची उत्साही, सुखात्मक पाने होती, ती केव्हाच वाचून झाली होती, आता ज्यात काहीच नाविन्य किंवा रोमांचक नव्हतं अशी पाने पलटत जात होती.ओल्गा इवानोव्हना घरी नव्हती, म्हणून आपला नायक दिवाणखोलीतील आरामखुर्चीत बसून तिच्या परतण्याची वाट पाहू लागला.
     “दोब्री वेचीर, निकोलाय इलिच!” निकोलायच्या कानावर एक बायकी आवाज पडला. “मम्मी सोन्यासोबत खरेदीला गेलीये.” त्याच खोलीत ओल्गाचा आठ वर्षीय मुलगा अल्योशा सोफ्यावर पहुडला होता. दिसायला गुटगुटीत, देखणा असणाऱ्या अल्योशाने अंगावर वेल्वेटचं काळं जाकेट घातलं होतं, तर पायात लोकरीचे लांब पायमोजे. अगदी एखाद्या चित्रकाराच्या पेंटिंगमध्ये असतो तसा त्याचा पोशाख होता. सोफ्यावर पडून तो आदल्या दिवशी सर्कशीत पाहिलेल्या करामतींची नक्कल करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याने पहिला एक पाय हवेत उचलला, मग दुसरा. त्याचे ते इवलेशे पाय दुखू लागल्यावर त्याने स्वतःच्या खांद्यांना कामाला जुंपले आणि पटकन उडी मारून तो रांगू लागला. नंतर पालथं होऊन दोन्ही पाय हवेत उंचावून चालला येत का, याचं प्रात्यक्षिक करू लागला. हे सर्व तो इतक्या गंभीरपणे करीत होता की त्यामुळे त्याला धाप लागत होती -अधून मधून त्रासिक चेहरा करून तो पश्चाताप व्यक्त करीत होता जणू - ‘ हे देवा तु मला असलं निरुपयोगी शरीर का दिलसं ?’
“हेलो छोटुकल्या !” निकोलाय बोलला, “ तुला पाहिलचं  नाही की मी ! तु तर इथेच आहेस की! मम्मी कशी आहे रे ?”
उजव्या हाताने डाव्या हाताचा अंगठा धरत अल्योशा पुर्वास्थितीत येऊ पाहत होता. मग तो उलथा झाला, उडी मारून उभा राहिला आणि लॅम्पशेडच्या आडून निकोलायकडे पाहू लागला. 
“ काय सांगायचं तुम्हाला...?” खांदे उडवीत अल्योशा म्हणाला, “म्हणजे मम्मी कधीच ठिक नसते.  ती एक बाई आहे ना ! आणि बायकांचं नेहमीच काही ना काही तरी असतं.”
रिकामं बसून दुसरा काही उद्योग करण्यासारखा नव्हता म्हणून निकोलाय अल्योशाचा चेहरा न्याहाळू लागला. ओल्गासोबत त्याने बरीचशी वर्षे घालविली होती, पण कधीच ह्या मुलाकडं त्याचं लक्ष गेलं नव्हतं. त्याला ह्या लहानग्याच्या अस्तित्वाचाच विसर पडला होता. ज्या ज्या वेळी निकोलाय ओल्गाच्या घरी यायचा, तेव्हा अल्योशा त्याच्या डोळ्यासमोर नेहमी असायचा पण त्याच्याबद्दल विचार करण्याची तसदी देखील निकोलायने कधी घेतली नव्हती – तो तिथं का आहे किंवा त्याची नेमकी कोणती भूमिका त्या घरात आहे!
संधिप्रकाशात आल्योशाचा पांढूरका चेहरा त्याचा काळ्याशार डोळ्यांसोबत थोडा चमकत होता. त्याच्या त्या  निरागस चेहऱ्याकडे पाहून निकोलायला त्याच्या प्रेमप्रकरणातील सुरवातीच्या काळातील तरुण ओल्गाची आठवण झाली, आणि त्याला वाटलं की अल्योशासोबत थोडं मोकळं होऊन बोलावं. 
“इकडे ये माकडा,” तो बोलला, “जरा मला तुला नीट पाहू दे.”
सोफ्यावरून उडी मारून अल्योशा ढेंगा टाकीत निकोलायपाशी गेला. “मग,” त्याच्या हडकुळया खांद्यावर हात ठेवीत निकोलाय म्हणाला, “काय म्हणतोस? घरी कसं चालययं सगळं?”
“कसं सांगू? अं, पूर्वी ठिक चाललं होतं बघा.”
“का? काय झालं रे ?”
“काही नाही, असचं ! पुर्वी आम्हाला फक्त संगीताचा आणि वाचनाचा गृहपाठ होता, आता बाईनी त्यात फ्रेंच कविता पाठांतराला दिल्या आहेत. तुम्ही नुकतीच दाढी केलीये असं वाटतंय.”
“हो, अलीकडेच.”
“हो, मला दिसतंय. तुमचे दाढीचे केस अगदीच लहान झालेत. मी तुमच्या दाढीला हात लावू का?” परवानगीची वाट न पाहता त्याने हात लावला देखील. 
“दुखतं का?”
“नाही.”
“आपण एक केस ओढला की दुखतं, पण भरपूर केस एकदम ओढले की दुखत नाही. हे असं कसं? हा हा! अरे तुम्हाला तर कल्लेच नाहीत. हे इथं आणखी थोडी शेव्ह करायला हवी होती... पण इथं या बाजूला थोडे केस असायला हवे होते...” तो सरळ निकोलायच्या मांडीवर जाऊन बसला.  त्याने निकोलायचा हात धरला आणि मनगटावरील घड्याळाच्या पट्ट्याशी खेळू लागला. 
“मी जेव्हा शाळेला जाईन ना,” अल्योशा सांगू लागला, “मम्मी मला एक नवीन घड्याळ घेऊन देणार आहे. मी आता तिला सांगणार - मला असलचं घड्याळ पाहिजे, असल्याच पट्ट्याचं. काय भारी लॉकेट आहे तुमचं! पप्पांकडे पण अगदी असलचं आहे. फरक एवढाच की तुमच्या लॉकेटवार तिरप्या रेषा आहेत तर पप्पांच्या लॉकेटवर अक्षरे आहेत... आणि हो, आठवलं, त्याच्या आत आईचं एक छोटं चित्र आहे. आत्ता त्यांनी पट्टा बदलला आहे, रिंगचा नाहीये रिब्बनचा आहे.”
“तुला कसं माहित? तु भेटतोस का तुझ्या पप्पाला?”
“मी ?? ह..ह..नाही..मी..”
अल्योशाच्या चेहऱ्याचा रंग पालटला.  आपण बोलून फसलो आहे हे त्याच्या लक्षात आलं. आणखीनच गोंधळून जात तो नखाने लॉकेट वर ओरखडू लागला.
निकोलायने त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहिलं आणि विचारलं,
“तु पप्पांना भेटतोस का?”
“न....नाही, नाही!”
“चल खोटं नाही सांगायचं. मनमोकळेपणाने सांगून टाक. तुझ्या चेहऱ्यावरूनच मी सांगू शकतो की तु खोटं बोलतोयस. हे बघ, आपण दोघे मित्रांसारखे गप्पा मारतोय ना? मग त्यात लपवायचं काय?  चल अब बता भी दे!”
अल्योशा विचारात पडला. 
“तुम्ही मम्मीला यातलं काही सांगणार नाहीत ना?” त्याने भीत भीत विचारलं.
“मी कशाला सांगू बरं?”
“प्रोमीस?”
“प्रोमीस!”
“देवाशप्पत ?”
“काय पिडा आहे रे तुझी! तु मला समजतोस तरी काय?”
अल्योशाने अजूबाजूला पाहिलं वं डोळे ताणून तो अतिशय हळू आवाजात निकोलायला सांगूू लागला. “फक्त देवाखातीर, मम्मीला तेवढं यातलं काहीही बोलू नका. मम्मीलाच काय, कुणालाच काही बोलू नका, कारण हे आमच एक टोप सिक्रेट आहे. जर मम्मीला समजलं तर..शप्पथच! माझी, सोन्याची आणि पेलागीयाची -तिघांचीही काही खैर नाही मग.  आता ऐका, दर मंगळवारी आणि शनिवारी मी न सोन्या पप्पांना भेटतो. जेव्हा पेलागीया लंचच्या अगोदर आम्हां दोघांना फेरफटका मारायला बाहेर घेऊन जाते तेव्हा आम्ही आफेलच्या रेस्टोरंटमध्ये जातो. तिथं पप्पा आमची वाट पाहत बसलेले असतात. आम्ही सर्व तिथे एका वेगळ्या खोलीत बसतो. तुम्हाला माहिती आहे का, तिथले टेबल मार्बलपासून बनवलेली आहेत आणि ऑश-ट्रेचा आकार मोरासारखा आहे...”
“तुम्ही तिथं काय काय करता?”
“काही खास असं नाही.पहिल्यांदा आम्ही एकमेकांना ग्रीटिंग्ज देतो, मग टेबलावर एकमेकांसमोर बसतो, मग पप्पा आमच्यासाठी कॉफी आणि पाई ची स्वीट डीश ऑर्डर करतात.  तुम्हाला माहिती आहे का, तिथं मटण घालून शिजवलेल पाई देखील आहेत, पण मला काय ते अजिबात आवडत नाहीत बघा. सोन्या खाते तसले. मला मात्र कोबी नि अंडी घालून केलेले पिरझ्की आवडतात.  आम्ही तिथं भरपेेेट खातो आणि नंतर घरी लंच करताना मम्मीला काही शंका येवू नये म्हणून तिथंही बक्कळ खातो.
“रेस्टॉरंटमध्ये बसून तुम्ही कशाबद्दल गप्पा मारता?”
“पप्पांसोबत? तसं आम्ही सगळ्या गोष्टी बाबत बोलत असतो. ते आमचे खूप लाड करतात.आम्हाला  आलिंगन देऊन पापा देतात.  नंतर छान छान विनोदी गोष्टी सांगतात.  तुम्हाला माहितेय का, पप्पा म्हणतात की आम्ही जेव्हा मोठे होऊ ना तेव्हा ते आम्हां  दोघांना त्यांच्या घरी राहण्यासाठी घेऊन जाणार आहेत.  सोन्या नाही म्हणतेय, पण मी तयार आहे.  मम्मी शिवाय खरच कंटाळा येणार,  तिची आठवण येत राहणार, पण मी तिला पत्रे लिहीन ना! थोडं विचित्र वाटेल, पण आम्ही सणासुदीला तिच्याकडे सुट्ट्यांना येवूच की राहायला—नाहीतर अजून पप्पा म्हणत असतात की ते माझ्यासाठी एक घोडा विकत घेणार आहेत.  कित्ती चांगले आहेत ना आमचे पप्पा!  मला कळतचं नाही की मम्मी पप्पांना आमच्यासोबत राहायला का बोलावत नाही?  ती आम्हाला त्यांना भेटायची परवानगी पण देत नाही ! ते तर तिच्यावर कित्ती प्रेम करतात, माहित आहे का? पप्पा दर भेटीला तिच्या तब्येतीची विचारपूस करतात.  ती काय करत असते, म्हणून विचारतात. एकदा मम्मी आजारी पडली होती ना, तेव्हा तर पप्पानी अस्सं डोकं गच्चं धरलं आणि ते सैरावैरा पळत होते.  ते आम्हाला नेहमी बजावतात - तिचं सर्व काही ऐका, तिचा नेहमी आदर करा म्हणून... आम्ही कमनशिबी आहोत, हे खरयं का हो?”
“हं..! का बरं?”
“असं पप्पा म्हणत असतात हो.  ते नेहमी सांगतात की तुम्ही दोघे कमनशिबी मुलं आहात. त्यांना तसं बोलताना ऐकताना मला तर भीतीच वाटते.  मी, तुम्ही आणि तुमची आई –सगळेच कमनशिबी आहोत.  दु:खी आहोत.  स्वत:साठी आणि तिच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा, असं म्हणतात.”
अल्योशाने त्याची नजर पेंढा भरून लटकवलेल्या पक्ष्यावर रोखली.तो विचारांत गढून गेला.
“तर...!” निकोलाय आवाजात बदल करीत बोलला, “तुम्ही लोकं अशी गुप्त खलबत करता आणि मम्मीला त्यातलं काहीच ठाऊक नाही.”
“तिला कुठुन कळेल बरं? काहीही झालं तरी पेलागीया मम्मीला यातला एक शब्दही कधी सांगणार नाही. माहितेय काय? परवाच पप्पांनी आम्हाला अंजीर खायला दिले होते. गोड गोड अंजीर !!अगदी जामसारखे गोड! मी एकट्याने दोन मोठी फस्त केलीत.”
“हो, बरं ते राहू दे...ऐक...तुझे पप्पा माझ्याबद्दल काही बोलतात का?”
“तुमच्याबद्दल? काय सांगू बरं तुम्हाला?”
अल्योशाने त्याची साशंक नजर निकोलायवर रोखली वं खांदे उडवून तो बोलला, “ते तुमच्याबद्दल असं काही बोलले नाहीत.”
“पण, तरीपण, काय बोललेत?”
“तुम्ही राग मानणार नाहीत ना?”
“आता आणि! राग मानायला ते मला काही वाईटसाईट बोलतात का? नावे ठेवतात का? तरीपण मी नाही मानणार राग, सांग.”
“वाईट काही नाही बोलत. पण तुमच्यावर राग आहे त्यांचा. ते म्हणतात की तुमच्यामुळे मम्मी दु:खी बनलीये आणि तुम्ही.... मम्मीच्या आयुष्याचा नाश केलात ! काहीतरीच विचित्र बोलत असतात ते. मी त्यांना नेहमी सांगत असतो की तुम्ही खूप चांगले आहात, मम्मीवर कधीच चिडत नाहीत, की ओरडत नाहीत. पण ते नुसतचं मान हलवत राहतात.”
“तर तो म्हणतो की ‘मी’ तिच्या आयुष्याची वाट लावली म्हणून?”
“हो! पण तुम्ही रागावू नका. वाईट वाटून घेऊ नका, निकोलाय इलिच!”
निकोलाय आरामखुर्चीवरून तडक उठला, थोडा वेळ तसाच उभा राहिला आणि मग खोलीत इकडून तिकडे फेऱ्या मारु लागला. 
“ही तर कमालच झाली म्हणायची ...हास्यास्पद!” खांदे उडवीत, उपहासात्मक हसून तो स्वताशी पुटपुटला. “स्वत: सर्वस्वी दोषी आणि मी तिचा नाश केला ? काय साजुकपणा! तो तुला असं म्हणाला की मी तिच्या आयुष्याची वाट लावली?”
“हो, पण... तुम्ही म्हटला ना की राग मानणार नाही म्हणून...?”
“मी रागावलेलो नाहीये... पण... हां तुझा प्रश्न नाहीये, तुला नाही समजणार !... हां तर कळसच झाला थट्टेचा! मी आगीतून फुफाट्यात पडल्यासारखा सापडलो आणि आता असं कळतंय की मीच गुन्हेगार आहे म्हणे.”
दरवाज्यावरील बेल ऐकू आली.  त्यासरशी उडी मारून अल्योशाने दरवाज्याकडे धूम ठोकली. दारातून एक स्त्री लहान मुलीसोबत खोलीत आली. ती अल्योशाची मम्मी होती – ओल्गा इव्हानोव्हना.  त्यांच्यामागोमाग उड्या मारत, मोठ्याने गुणगुणत अल्योशा आला. त्याने निकोलायला हातानेच खुण केली, निकोलायानेही त्याला प्रतिसाद देत मानेनेच इशारा केला. त्याचं दिवाणखान्यात येरझाऱ्या घालणं चालूच होतं.
“बरोबरच तर आहे! आता कोणाला आरोपी बनवायचा, मला नाही तर कोणाला?” ऐकू जाईल एवढ्या आवाजात तो पुटपुटला. “नाही !..त्यातच खरं आहे, तो अभागी नवरा!”
“कशाबद्दल बोलतोयस तू?” ओल्गाने विचारलं.
“कशाबद्दल? ऐक जरा! तुझा सभ्य साळसूद नवरा माझ्याबद्दल कसल्या हास्यास्पद अफवा पसरवत आहे ते. असं आहे की, मीच नालायक आहे, मीच खलनायक आहे. तुझं आणि तुझ्या मुलामुलींचं आयुष्य मीचं खराब केलं. तुम्ही सगळे अभागी आहात आणि मी एकटाच तेवढा सुखी माणूस ! अगदी स्वर्गसुख उपभोगतोय ना मी!”
“निकोलाय, मी समजले नाही. काय चाललंय हे सगळं?”
“तर मग ऐक ,तुमचे छोटे राजे काय म्हणतायेत ते!” अल्योशाकडे बोट दाखवीत निकोलायने उत्तर दिलं.
अल्योशाचा चेहरा गुलाबी झाला, मग पांढराफट. भीतीने तो थिजलाच.  
“निकोलाय इलिच!” मोठ्या आवाजात त्याने याचना केली, “शु...!”
ओल्गाने आश्चर्याने प्रथम अल्योशाकडे बघितलं, मग निकोलायकडे आणि पुन्हा अल्योशाकडे.
“विचार त्याला!” निकोलयने त्रागेचा स्वर सोडला नाही, “ती तुझी बेअकली मूर्ख पेलागीया या दोघांना रेस्तोरंटमध्ये घेऊन जाते. तिथं त्यांच्या लाडक्या पप्पांशी गुप्त बैठका घडवून आणते.  पण मुद्दा हा  नाहीये, खरा मुद्दा आहे की त्यांचे प्रिय पिताश्रीच छळ सोसणारे हुतात्मा आहेत आणि मी म्हणजे तुमच्या सर्वांचं आयुष्य नासवणारा नालायक दृष्ट प्राणी!!”
“निकोलाय इलिच....” अल्योशा आता काकुळतीला आला होता.  “का..? तुम्ही प्रोमीस म्हटलं होतं, शब्द दिला होता!”
“पुरे आता तुझं!” हातानेच निकोलयाने त्याचं म्हणनं झटकावून टाकलं.
“हा मामला दिलेल्या सर्व शब्दांपेक्षा,शप्पथांपेक्षा महत्वाचा आहे. मला खोटं बोललेलं, ढोंग केलेलं अजिबात खपत नाही.”
“मला काही एक समजत नाहीये” ,मती गुंग झाल्याप्रमाणे ओल्गा बोलली. तिच्या डोळ्यात अश्रुंचे टपोरे थेंब चमकत होते. “ल्योल्का, बाळा.” तिने स्वत:च्या मुलाकडे विचारणा केली, “खरं खरं सांग, तु तुझ्या पप्पांना भेटतोस का?”
अल्योशाला तो प्रश्न ऐकू गेलाच नाही.  थिजलेल्या नजरेने तो निकोलायकडे एकटक बघत होता.
‘”नाही! असं असू शकत नाही!” त्या आईला काही केल्या आरोप मान्य होत नव्हते. “पेलागीयालाच विचारले.”
ओल्गा दिवाणखोलीतुन बाहेर गेली.
“तुम्ही... तुम्ही प्रोमीस केलं होतं ना!” थरथरणाऱ्या अल्योशाला अजून विश्वास बसत नव्हता.
निकोलायने त्याला हातानेच बाजूला झटकलं व तो पूर्ववत येरझाऱ्या घालू लागला. स्वत:च्या अपमानाच्या विचारात तो इतका गुंग झाला होता की पूर्वीप्रमाणेच त्याला त्या लहानग्याच्या अस्तित्वाचा विसर पडला.  त्याच्यासारख्या मोठ्या, सभ्य गृहस्थाला त्या लहान मुलाशी काय देवाणघेवाण? अल्योश्या एका कोपऱ्यात जावून बसला. तिथं सोन्या उभी होती. आपली कशी फसवणूक झाली हे तो तिला सांगू लागला. त्याचं अंग थरथरत होतं. शब्द बोबडे होत होते. आणि शेवटी त्याच्या त्या इवल्याश्या काळ्याशार डोळ्यांचा बांध फुटला..
आयुष्यात पहिल्यांदाच, त्या दिवशी बाहेरील दुनियादारीच्या खोटेपणाशी आणि फसवणुकीशी त्याचा सबंध आला. नाहीतर तेंव्हापर्यंत त्या बिचारयाला माहितच नव्हतं की, जगात गोड अंजीरे, पिरझ्की, महागडी घड्याळे ह्यांच्या व्यतिरिक्त देखील अशा बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी आहेत ज्यांना अजूनही लहान मुलांच्या भावविश्वात शब्दच नाहीत...!

मूळ रशियन लेखक - अंतोन चेखव
अनुवाद - इर्शाद बोरकर,
संशोधक सहाय्यक , इंग्रजी आधिविभाग, 
शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर.
irshadruss@gmail.com
७०२०८८७३५२

Comments

Mansing said…
उत्कृष्ट अनुवाद अनु बांधून ठेवणारी शब्दरचना..
शुक्रीया सरजी
Madhuri Vetal said…
Mstch Irshad...Thank you...
Unknown said…
Nice 👌🏻👌🏻👌🏻
Rationalist said…
उत्तम अनुवाद इर्शाद!
-सर्वेश
Unknown said…
अतिशय सुंदर
खुपच सुंदर 🙏🌷😊👌👏
सुन्न झाले वाचून...!! अप्रतिम अनुवाद!!!
Very good! You are now a professional translator!
Jabbin Makandar said…
अप्रतिम...!!!

Popular posts from this blog

आणि मार्क्स रशियात पोहोचतो..

Words matter!

'You will never learn the language...