बदला - अंतोन चेखव
बदला - अंतोन चेखव
बायकोने विश्वासघात केला हे समजल्यानंतर काही तासांतच फ्योदर सिगाएव हा ‘शुम्स्क आणि कंपनी’ ह्या बंदुकविक्री करणाऱ्या दुकानात उभा होता. तो स्वतःसाठी एक चांगली रिव्हॉल्वर खरेदी करत होता. चेहऱ्यावर त्याच्या संताप,अपमान,दुःख आणि अटळ निश्चलता यांचं अजब मिश्रण होतं.
' मला माहितेय मला काय केलं पाहिजे.' तो विचार करीत होता, ' कौटुंबिक पावित्र्यालाच काळिमा फासला तिने.मानवी सन्मान पायदळी तुडवला जातोय आणि पापाचा विजय होतोय. म्हणुनच, अशा परिस्थितीत एक जबाबदार नागरिक आणि प्रामाणिक माणुस म्हणून मी बदला घेतलाच पाहिजे.... पहिल्यांदा तिला गोळी घालणार, मग तिच्या प्रियकराला आणि मग स्वतःला !'
त्याने अजुन बंदुक खरेदी केली नव्हती कि कुणाला ठार मारलं नव्हतं, पण त्याच्या कल्पनाशक्तीने त्याच्या डोळ्यांसमोर केव्हांच एक चित्र रंगवायला सुरवात केली होती - रक्ताच्या सडयात पडलेली तीन प्रेतं, गोळ्या लागुन फुटलेली डोकी, त्यातून बाहेर वाहणारं रक्त, त्याला फसवण्याऱ्या पत्नीच्या निर्जीव चेहऱ्यावरील मृत्युयातना, आरडाओरडा, बघ्यांची भीतीने गोठलेले डोळे, नातेवाईकांची आणि शेजाऱ्यापाजार्यांची रडगाणी..... हे सारं काही पाहताना अपमानित मनुष्याने सूड घेतल्यावर त्याला जो आसुरी आनंद होतो, तो आनंद सिगाएवच्या चेहऱ्यावर होता. कल्पनाशक्तीची आणखी एक भरारी घेवून त्याने पुढच्या दिवशीच्या वर्तमानपत्रात 'कौटुंबिक मुल्यांच्या ऱ्हासासंबंधी' छापून येणारे लेखदेखील वाचून काढलेत.
पांढरं जॅकेट घातलेला एक उत्साही,ढेरपोट्या गिड्डा तेथील दुकानदार होता. त्याने सिगाएवसमोर एक छोटी रिव्हॉल्व्हर ठेवली. ग्राहकांसाठी राखून ठेवलेलं हास्यं चेहऱ्यावर आणत, एका पायावरून दुसऱ्या पायावर भार देवून तो सिगाएवला बंदुकीबद्दल सांगू लागला.
" मस्यो," फ्रेंच भाषेत संबोधन करून त्याने आपण 'सुसंस्कृत' असल्याचा पुरावा दिला, " मला विचाराल तर, मी स्मिथ-विस्सोनच्या मेकची हि सुंदर रिव्हॉल्व्हर घेण्याचा सल्ला तुम्हाला देईन. शस्त्रास्त्रांमधील अंतिम शब्द ! ट्रिपल ऍक्शन, इजेक्टरसहित. अगदी सहाशे फुटांवरील लक्ष्याचा सुद्धा बरोबर वेध घेते. काय फिनिश आहे बघा हिचा, मस्यो! सर्वात आकर्षक डिझाइन, वादच नाही ! आमच्याकडे येणारे घरफोडे,चोर,फसवले गेलेले आशिक यांना आम्ही दररोज किमान दहा-बारा तरी ह्या रिव्हॉल्व्हर विकतो . अगदी योग्य नि खात्रीलायक हत्यार आहे बघा. बायको आणि त्याच्या प्रियकराला तर एकाच गोळीत संपवते. आणि आत्महत्येबाबत बोलायचं झालं तर,मस्यो, हिच्यापेक्षा दुसरी बेहतर बंदुक माझ्या पाहण्यात तरी नाही."
दुकानदाराने प्रात्याक्षिक दाखवण्यासाठी रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर खेचला, त्याच्या नळीवर फुंकर घातली, समोर नेम धरला आणि चाप ओढला. त्याच्या तोंडाच्या रेषा अशा बनल्या कि जणू एखाद्या कट्टर शत्रूला नुकतंच उडवलं . स्वर्गीय आनंदाने आणि समाधानाने भरलेल्या त्याच्या चेहऱ्याकडे पाहून एखाद्याला नक्कीच वाटलं असतं कि स्मिथ-विस्सोनची एखादी अशी बंदुक दुकानदाराच्या मालकीची असती, तर त्याने दोन-चार गोळ्या सहज स्वतःच्या डोक्यात झाडून घेतल्या असत्या.
"काय किंमत आहे हिची?" सिगाएवने विचारलं.
" फक्त पंचेचाळीस रुबल्स,मस्यो !"
" हं ! महाग आहे!"
" जर तसं असेल, मस्यो, तर मी तुम्हाला थोड्या स्वस्तातल्या दाखवतो. इकडे बघा, आमच्या दुकानात हर तऱ्हेच्या, हर किमतीच्या बंदुका उपलब्ध आहेत. उदाहरणदाखल हि लिफोशे कंपनीची रिव्हॉल्व्हर. केवळ अठरा रुबल्स ! पण ( इथं दुकानदाराने उगाच तुच्छतेने खालचा ओठ वाकडा केला.) मस्यो, हि बंदुक कालबाह्य झालीये, तिचा जमाना केव्हांच गेलाय. आजकाल फक्त डोकं फिरलेल्या बाया आणि अतिशहाणे लोकच असल्या बंदुका खरेदी करतात. महत्वाचं म्हणजे या बंदुकीतून पत्नीला मारणे किंवा आत्महत्या करणे अभिरुचिहीन समजलं जातं. खरी शान आहे ती स्मिथ-विस्सोनच्या बंदुकीत."
" मला आत्महत्या करायची नाहीये कि कुणाचा खून करायचा नाहीये." थोडंसं चिडक्या स्वरात, दुर्मुखलेल्या तोंडाने सिगाएवने थाप मारली. " खेड्यातील माझ्या फार्महाउससाठी मी बंदुक खरेदी करतोय...चोर, घरफोडी यांच्यापासून सुरक्षितता म्हणून." सिगाएवच्या आयुष्यभराच्या कमाईतसुद्धा तो फार्महाउस विकत घेवू शकत नव्हता.
" तुम्ही कशासाठी खरेदी करताय याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही." हसून, दबक्या आवाजात आदबशीरपणे दुकानदार बोल " जर प्रत्येक व्यवहारात आम्ही खरेदीमागचं कारण शोधात बसलो तर व्यवसाय बंद करायची वेळ येईल आमच्यावर. जर चोरांना पळवून लावायचं असेल, मस्यो, तर हि लिफोशे काय कामाची नाही, कारण तिच्या फायरिंगचा आवाज अगदीच दबका आहे, गोळी झाडलेली ऐकू पण येत नाही. त्यासाठी मी तुम्हाला हि मोर्तीमेरची खास पिस्तुल सुचवेन. तिचं नाव देखील खास आहे- फायटर गन !"
‘ हं ... त्याला द्वदंयुद्धत दोन हात करण्यासाठी आव्हान दिलं तर? चालणार नाही का?’ सिगाएवच्या डोक्यात नवीन विचार चमकला, ‘नाही ! लई भाव मिळेल त्याला. उगाचच कशाला प्रतिष्ठा द्या? अशा माणसाला कुत्तेकी मौत मारलं पाहिजे !'
दुकानदाराचं आदबीने इकडून तिकडे वळणे, एका पायावरून दुसऱ्या पायावर भार देणं सुरुचं होतं . त्याच्या चेहऱ्यावरील चिरंतन हास्य आणि चिरंतन बडबड चालू होतीच. बंदुकीचे ढीगच्या ढीग तो सिगाएवच्या समोर मांडत होता. पण त्या सर्व बंदुकांत उजवी ठरत होती ती म्हणजे स्मिथ-विस्सोनची रिव्हॉल्व्हर ! सिगाएववर तिची मोहिनी पडली होती. त्याच्या कल्पनाशक्तीने परत एकदा उचल खाल्ली. मनातल्या कॅनव्हासवर चित्र रंगलं होतं ते असं - त्याने दोघांच्या खोपडीत गोळ्या घातल्या आहेत, जखमेतून भळभळत्या रक्ताचे पाट कार्पेटवर वाहतायेत, त्याचा विश्वासघात करणाऱ्या बायकोचे पाय मारण्यातनेच्या शेवटच्या कळांनी थरथरत आहेत... पण....पण त्याच्या खवळलेल्या, दुखावलेल्या, अपमानित मनाला इतका बदला पुरेसा नव्हता. हे रक्तरंजित चित्र, वेदनेच्या किंकाळ्या, मृत्यूची भयावयता या सगळ्यांनी सिगाएवचं मन काही शांत होत नव्हतं, त्याला समाधान वाटत नव्हतं.. 'यापेक्षा काहीतरी अधिक भयानक शिक्षा दिली पाहिजे तिला.'
' समजलं ! पहिला त्याला ठार करणार, मग स्वतःला गोळी घालणार,' त्याने विचारांना मुक्त केलं, ‘आणि तिला जिवंत सोडून देणार. अपराधी सद्सद्विवेकबुद्धीच्या टोचणीने आणि लोकांच्या तुच्छ नजरांनी अपमानित होवून मरू देत तिला. तिच्यासारख्या हळव्या मनाच्या बाईला हि सजा मृत्यूपेक्षा अधिक छळणारी असेल.'
...आणि सिगाएवला त्याची अंतयात्रा दिसू लागली. - अपमानित झालेला मृत नवरा आता शवपेटीत चिरनिद्रा घेतोय, त्याच्या गालावर निष्पाप हास्य आहे. व ती… ती एकदम पांढरीफट,निस्तेज होवून शवपेटीच्या मागून अंतयात्रेत चालत आहे. अपराधी मनाच्या जीवघेण्या यातना तिच्या चेहऱ्यावर आहेत, आजूबाजूच्या चिडलेल्या लोकांच्या भेदक,तुच्छतापूर्ण नजरांपासून बचाव करत कुठं तोंड लपवावं हे तिला समजत नाहीये....
" तुम्हाला स्मिथ-विस्सोनची बंदुक आवडलेली दिसते,मस्यो" दुकानदाराने सिगाएवच्या स्वप्नांळू दुनियेवर आक्रमण केलं, " जर तुम्हाला ती फारच महाग वाटत असेल तर मी पाच रुबल्सची सूट द्यायला तयार आहे... आणि ते सुद्धा परवडत नसेल तर आमच्याकडे आणखी स्वस्तातल्या बंदुका आहेत." तो यांत्रिकपणे भिंतीकडील कपाटाकडे वळला व तिथून बंदुकांचे एक डझनभर खोकी काढुन सिगाएवसमोर ठेवले.
" मस्यो, हि बघा. किंमत केवळ तीन रुबल. स्वस्तात मस्त ! एकीकडे बाजारात रुबल दररोज घसरतोय तर दुसरीकडे प्रत्येक क्षणी आयातीवरील जकात वाढत चालली आहे. या गोष्टींचा विचार केला तर हि किंमत अगदी क्षुल्लक आहे. मस्यो, देवाशपथ सांगतो, मी स्वतः व्यवस्थेचा कट्टर समर्थक आहे पण आता मला देखील कुरबुर करायची वेळ आली आहे. बोललंच पाहिजे. खरचं , हे रुबलचं घसरने आणि आयात कर वाढवणे म्हणजे एक चाल आहे, जेणेकरून फक्त आणि फक्त श्रीमंत लोकांनाच शस्त्रे घेता यावीत आणि आम्ही गरिबांनी त्या तुला प्रांतात तयार होणाऱ्या खेळण्यातल्या बंदुका वापरायच्या. काय जुलूम म्हणायचा हा ! अशा बंदुकांतून बायकोवर नेम धरून चाप ओढा. गोळी तिला न लागता उलट्या बाजूतून तुमच्या स्वतःच्या खांद्यात आरपार !"
सिगाएवला एकाकी वाईट वाटू लागलं. त्याला फसवणाऱ्या स्त्रीचा छळ स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी तो जिवंत असणार नाही याची त्याला जाणीव आत्ता झाली. बदल्याची फळे चाखायची संधी मिळते तेव्हाच तो गोड लागतो, नाहीतर शवपेटीत निपचित, निर्जीव पडून राहून काय फायदा? एकदा मेल्यानंतर त्याला सूडाचा आनंद जाणवणार आहे थोडीच?
' बरं मग असं केलं तर?' त्याची विचारचक्रे पुन्हा फिरू लागलीत, ' त्याला ठार करायचं, मग त्याच्या दफनविधीला जायचं, तिथं तिच्या दुःखाचा नि यातनांचा आनंद उपभोगायचा आणि मग शेवटी स्वतःला गोळी घालायची....... छे ! असं करून नाही चालणार. दफनविधीला गेलो तर पोलीस तिथंच अटक करतील नि बंदुक जप्त करून घेतील. काय करावं?.... कळालं ! त्याला मारणार, तिला सोडून देणार नि मी... मी तात्पुरतं स्वतःला नाही मारत. सरळ पोलीसांकडे जावून अटक करवून घेणार. स्वतःला काय नंतर केव्हाही गोळी घालता येईलच. तुरुंगाचा फायदा असा कि चौकशीच्या वेळी सर्व अधिकाऱ्यांसमोर व समाजासमोर तिच्या पापाचा पाढा वाचायची संधी मला मिळेल. जर मी स्वतःला मारलं तर कदाचित हि दुष्ट बया तिचं अभिनयकौशल्य नि खोटारडेपणा वापरून बरोबर माझ्या माथ्यावर सगळा दोष मारेल व समाजदेखील तिचं खोटंनाटं ऐकून तिला माफ करेल आणि लोकं माझ्यावर दात काढून हसत राहतील.... जर...जर मी जिवंत राहिलो… '
एक- दोन मिनिटांनी त्याचे विचार काहीसे असे होते.
' हो, जर मी स्वतःला मारलं तर लोक मलाच दोषी ठरवतील व माझ्याच चारित्र्यावर संशय घेतील.. आणि महत्वाचं म्हणजे मी स्वतःला का म्हणून मारावं? हि झाली पहिली गोष्ट. दुसरी म्हणजे, आत्महत्या करणे म्हणजे भेकडपणा, भित्रेपणा ! म्हणूनच, आता ठरलं - पहिला तिच्यासमोर त्याला मारणार, तिला सोडून देणार, नंतर सरळ कोर्टात जाणार. कोर्टात माझ्यावर खटला चालवतील. मग तिला साक्षीदार म्हणून तिथं यावं लागणार... माझ्या वकिलाने प्रश्नांची सरबत्ती सुरु केल्यावर ती गोंधळणार. शरमेने , अपमानाने लाल होणार... सगळं स्पष्ट दिसतंय... कोर्टाची, जनतेची, पत्रकारांची- सगळ्यांची सहानभुती मला मिळणार, ती सर्वजण माझ्या बाजूने असणार."
सिगाएव असा विचार करत असताना दुकानदार मात्र एका पाठोपाठ एक अशा अनेक बंदुका त्याच्यासमोर ठेवत होता. तोंडाचा पट्टा न थांबवता सिगाएवला आपल्या धंद्यांची खडा न खडा माहिती देणे हे आपलं परम कर्तव्य आहे असं त्याला वाटत असावं.
" मस्यो, हि बघा इंग्लिश बनावटीची बंदुके. अलीकडेच आली आहेत आमच्याकडे." एक बंदुक दाखवत तो सांगु लागला, "पण तुम्हाला खात्री देतो, हि सारी बंदुके स्मिथ-विस्सोनच्यापुढे फिकी पडतात. अगदी अलीकडचीच घटना आहे, कदाचित तुम्ही वाचलंदेखील असाल वर्तमानपत्रात. आमच्याइथून एका अधिकाऱ्याने स्मिथ-विस्सोनची बंदुक खरेदी केली. त्याने घरी जाऊन बायकोच्या प्रियकरावर गोळी झाडली....आणि माहितेय पुढं काय घडलं? गोळी त्याला छेदून आरपार गेली, मग एका ब्रॉन्झच्या लॅम्पमधून आरपार, मग सरळ दिवाणखान्यातील पियानोला छेदून त्याच्यापलीकडील कुत्र्याला ठार करून सरळ बायकोच्या खांद्यात ! रिव्हॉल्व्हरचा रिझल्ट हा असा जबरदस्त आहे. ह्या प्रकरणाने आमच्या फर्मची पत वाढवली आहे. त्या अधिकाऱ्याला नंतर अटक झाली. अर्थातच त्याच्यावर खटला चालवतील आणि नंतर जन्मठेपेची शिक्षा भोगायला सखलिनच्या बेटावर रवानगी करतील ! मुद्द्याचं बोलायचं झालं तर आपल्याकडील पिनल कोड फार जुना झालाय, त्यातच न्यायव्यवस्था हि नेहमी त्या प्रियकर लोकांच्या बाजूने असते. का विचारा! सोपं आहे मस्यो ! न्यायाधीश, वकील, ज्युरी , प्रॉसिक्युटर, बेलीफ हि सगळी मंडळी स्वतः दुसऱ्यांच्या बायकांसोबत मस्त जीवन जगतात. खटल्यात शिक्षा होऊन रशियातून एखादा नवरा कमी झाला तर त्यांना ते हवंच आहे ना ! सरकारने सर्व नवऱ्यांना जन्मठेप ठोकून सखलिनला पाठवलं तर समाजाला आनंदच होईल. मस्यो, तुम्हाला माहित नाही, समाजातील आजकालचं हे नैतिक अधःपतन बघताना माझ्या मनात कसली भयंकर चीड निर्माण होते. दुसऱ्याच्या बायकोशी प्रेमप्रकरणे करणं हे आता दुसऱ्याची सिगारेट घेऊन ओढणं किंवा इतरांची पुस्तके घेऊन वाचणं इतकं समाजमान्य झालं आहे. प्रत्येक वर्षी आमचा धंदा रोडावत चालला आहे बघा. याचा अर्थ असा नव्हे कि प्रियकरांची संख्या घटतेय, पण झालंय असं कि हे नवरेलोक नमते घेतात. कोर्टाला, सक्तमजुरीची शिक्षेला भितात नि झालेल्या फसवणुकीशी समेट करून शांत बसतात."
दुकानदाराने आजूबाजूला बघितलं आणि अतिशय हळू आवाजात तो पटकन म्हणाला, " ह्याला दोषी कोण आहे माहितेय का,मस्यो? सरकार !"
'कुठल्यातरी फालतू डुकराच्या नादात सखलिनवर जन्मठेपेत कुजून मरण्यात काही शहाणपणा नाही.' सिगाएवच्या विचारांना आणखी एक दिशा मिळाली होती. ' मला जर जन्मठेपेची शिक्षा झाली तर तिला दुसऱ्यांदा लग्न करून आणखी एका बिचाऱ्याला फसवण्याची आयती संधी मिळेल. शेवटी तिचाच विजय होईल...'
'...हं. म्हणूनच - तिला जिवंत सोडून देणार, स्वतःला देखील गोळी घालणार नाही, आणि त्याला.... त्याला देखील मारणार नाही... काहीतरी अधिक परिणमकारक नि शहाणपणाचा मार्ग शोधला पाहिजे... सापडला ! घटस्फोटासाठी अर्ज करेन आणि कोर्टात तिला बरोबर उघडी पाडेन. त्या दोघांना तुच्छ लेखून, अपमान, निंदा नालस्ती सहन करण्याची शिक्षा देईन.'
" मस्यो, हि आणखी एक नवीन मेकची पिस्तूल बघा" कपाटातून आणखी डझनभर बंदुका काढून दाखवत दुकानदार सांगू लागलं, " हिच्या बनावतीकडे जरा बारीक लक्ष द्या, म्हणजे तिचा अस्सलपणा तुम्हाला कळून येईल."
कुणालाही मारायचं नाही हा निर्णय एकदा घेतल्यानंतर सिगाएवला आता बंदूक खरेदी करण्याची गरजच उरली नव्हती. पण तो दुकानदार आपल्याच नादात होता, त्याचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. दुकानातील विक्रीच्या जवळपास सर्व बंदुका तो सिगाएवच्या समोर मांडत गेला.सिगाएवला त्याची कीव येऊ लागली. त्याला वाईट वाटलं कि त्याच्यामुळे दुकानदाराचा इतका वेळ वाया गेला. त्याची शक्ती, त्याचं ते हास्य, दुकानदारीतील कौशल्य, उत्साह सर्व काही फुकट गेलं होतं.
" ठीकाय, असं असेल तर ," काहीतरी बोलायचं म्हणून तो पुटपुटला, " मी नंतर येईन.. किंवा कुणालातरी पाठवून देईन."
त्याने दुकानदाराच्या तोंडाकडे बघायचं टाळलं. घडलेल्या पेचप्रसंगातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आता तेथून काहीतरी खरेदी करणे भाग आहे, असं सिगाएवने स्वतःला समजावलं. पण घ्यायचं काय? भिंतींवर लटकवलेल्या वस्तूंकडे त्याने नजर फिरवली. काहीतरी स्वस्त वस्तु त्याला निवडायची होती. त्याची नजर दरवाज्यापाशी लटकवलेल्या एका छोट्या जाळ्यावर स्थिरावली.
" ते काय आहे?" त्या जाळ्याकडे बोट करत त्याने विचारलं.
" ते? ते पक्षी पकडायचं जाळं आहे."
" काय किंमत?"
"आठ रुबल्स, मस्यो."
" नीट बांधून द्या... "
तर, बायकोकडून अपमानित झालेल्या नवऱ्याने दुकानदाराला आठ रुबल्स दिलेत, स्वतःला काहीही उपयोगाचं नसलेलं जाळं खरेदी केलं आणि मनात अधिक अपमानित वाटून तो दुकानातून बाहेर पडला.
मूळ रशियन लेखक - अंतोन चेखव
©अनुवाद - इर्शाद वडगांवकर
शिवाजी विद्यापीठ.
७०२०८८७३५२

Comments