वार्काची झोप - अंतोन चेखव
वार्काची झोप - अंतोन चेखव
रात्र बरीच सरली होती. मोलकरीण म्हणून काम करणारी तेरा वर्षाची वार्का पाळण्यातील लहान मुलाला हलवीत तिच्या क्षीण झालेल्या आवाजात अंगाईगीत गुणगुणत होती.
'बायु बायुश्की बायु,
आ या पेसिन्कु स्पोयु.
मेरीच्या आयकॉन समोर एक छोटा हिरवा दिवा मिणमिणत होता. खोलीत एक कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत टांगलेल्या दोरीवर लहान बाळाचे कपडे आणि दोन चार राखाडी रंगाच्या विजारी लटकविलेल्या होत्या. कोपऱ्यात जळणाऱ्या दिव्याच्या प्रकाशाने खोलीच्या छतावर एक मोठ्ठा हिरवा ठिपका तयार केला होता, तर दोरीवर लटकविलेल्या बाळाच्या कपड्यांनी व विजारींणी मिळून खोलीत उबेसाठी बसवलेल्या मोठ्या शेगडीवर ,पाळण्यावर आणि वार्काच्या झोपाळू चेहऱ्यावर लंबुळक्या आकाराच्या सावल्या टाकल्या होत्या. जेव्हा दिव्याची ज्योत वाऱ्याने फडफडायची तेव्हा हा ठिपका आणि लंबुळक्या सावल्या जणू जिवंत व्हायच्या, त्यांच्यात हालचाल निर्माण व्हायची. खोलीत सर्वत्र चांभार कामाच्या वस्तूंचा आणि कोबीच्या शिळ्या सूपाचा वास भरून राहिला होता; त्यामुळे हवा कुबट झाली होती.
पाळण्यातील मुलाचं रडणं चालू होतं. बराच वेळ रडल्यामुळं ते दमले होतं. त्याचा आवाज क्षीण झाला होता, पण मंद रडणं चालूच होतं. ते कधी शांत होईल याचा थांगपत्ता लागत नव्हता; पण वार्काला मात्र झोप आवरत नव्हती. तिला झोपेची नितान्त गरज होती. तिच्या पापण्या जाड झाल्या होत्या, डोकं पुढं झुकलं होतं, मानेवर ताण येउन ती दुखु लागली होती. तिला वाटत होतं की तिचं तोंड कोरडं पडून संपूर्ण चेहरा लाकडासारखा कठीण झाला आहे.कुठल्याही अवयवाची हालचाल करणं तिला शक्य होत नाहीये. "बायु बायुश्की बायु" तिचं गुणगुणणे सुरूच होतं, "तिबे काश्कि नवारयु"
चुलीपाशी कुठेतरी रातकिडे किरकिरत होते. दरवाज्या पलीकडून बाजूच्या खोलीतुन तिचे मालक आणि घरातील कामगार अफानासि यांच्या घोरण्याचा आवाज येत होता. हलणाऱ्या पाळण्याचा भकास आवाज आणि वार्काचं मंद गुणगुणणे यांच्या मिश्रणातून एक अजब पण आल्हाददायी संगीत तयार झालं होत, जे लहान मुलांना बिछान्यावर पडल्यावर एेकायला आवडतं. पण तेच संगीत या घडीला वार्काला त्रासदायक नि असहय्य्य होत होतं. कारण ते तिला झोपेकडे खेचत होतं. पण वारकाने झोपता काम नये! जर तिला झोप लागली तर तिचे मालक-मालकीण मारतील ना बिचारीला.
दिव्याची वात फडफडली त्यासरशी हिरवा ठिपका व लंबुळक्या सावल्या जिवंत झाल्या. वार्काच्या स्थिर, अधर्वट मिटलेल्या डोळ्यांवर त्यांचं अतिक्रमण सुरु झालं. थोड्याच वेळात त्यांनी तिच्या अर्धवट गुंगीत असलेल्या मेंदूचा कब्जा घेऊन तिथं एक धूसर दिवास्वप्न रंगवलं. तिनं पाहिलं - आकाशात गडद काळे ढग लहान मुलांसारखे किंचाळत एकमेकांचा पाठलाग करताहेत. पण लगेच वाऱ्याचा एक मोठा झोत आला, त्याने ढगांना दुर लोटून लावलं. आता वार्काला खेडेगावातील एक मोठ्ठा रस्ता दिसू लागला, जो पाण्यासारख्या चिखलाने भरला होता. रस्त्याच्या कडेने बैलगाड्यांची रांग लागली होती. लोकं पाठीवर गाठोडी घेऊन त्या गाड्यांजवळून पाय ओढीत चालले होते.त्यांच्या सावल्या पुढे मागे सरकत विचित्र खेळ करीत होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं गारठलेल्या दाट धुक्यांमधून जंगल अस्पष्ट ,अंधुकसं दिसत होतं. अचानक पाठीवर गाठोडे ओढत नेणारी ती लोकं मटकन चिखलभऱ्या जमिनीवर बसलीत.
'हे असं का केलतं तुम्ही?'वार्काने विचारलं.
'आम्हाला झोपायचं आहे! झोप हवीयं' एकाने उत्तर दिलं, आणि क्षणार्धात त्या सर्वांना गाढ झोप लागली होती.समाधानाने ते शांत झोपी गेले होते. रस्त्याकडील टेलिग्राफच्या खांबावरील तारेवर बसलेले कावळे त्यांच्या कर्कश्श आवाजात ओरडून त्यांना जागे करण्याचा प्रयन्त करू लागले; अगदी पाळण्यातील रडणाऱ्या मुलाप्रमाणे.
'बायु बायुश्की बायु, आ या पेसिन्कु स्पोयु.' वार्का गुणगुणत होती. अर्धवट मिटलेल्या डोळ्यांसमोर तिला एका कुबट, बसक्या,अंधार्या खोलीतील स्वतःची आकृती दिसली.
मरणयातना भोगणारा तिचा बाप येफिम स्तीपानोव जमिनीवर एका कडेहुन दुसऱ्या कडेवर लोळत पडला आहे. तिला तो अंधारामुळे दिसत नाहीये, पण तीव्र वेदनेमुळे त्याचं विव्हळणं व जमिनीवरचं लोळणं तिला ऐकू येतंय. त्याचे आतडे जळत आहेत.वेदना इतक्या असह्य आहेत की त्याला तोंडातून एक शब्द देखील काढता येत नाहीये. तो दीर्घ श्वास घेतोय व दात गच्च आवळून गळ्यातून बु बु बु असा आवाज काढतोय.
वार्काची आई पेलागिया येफिमच्या मरणासन्न अवस्थेबदल तिच्या मालकांना सांगायला त्यांच्या इस्टेटीवर गेली आहे. तिला जाऊन बराच वेळ झाला आहे,आतापर्यंत ती परत यायला हवी होती. लहानगी वार्का चुलीपाशी पहुडली आहे, पण ती झोपलेली नाहीये. बापाचं बु बु बु वेदनामय विव्हळणं ती कान देऊन ऐकत आहे. तिला इतकच समजतंय की बापाला काहीतरी त्रास होतोय.तितक्यात झोपडीपाशी कुणीतरी आल्याची चाहूल तिला लागली. येफिमच्या मालकांनी शहरातून त्यांच्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या डॉक्टरला पेलागिया सोबत पाठवलं होतं. डॉक्टर झोपडीत येतो. अंधारात त्याला काहीच दिसत नाही, पण येफिमच्या खोकण्याचा आवाज त्याला ऐकू येतोय.
'मेणबत्ती लावा', तो म्हणतो.
'बु बु बु' येफिम उत्तर देतो.
पेलागिया धावत चुलीपाशी जाते.एका फुटक्या भांड्यात मेणबत्ती नि आगपेटी शोधते. भयाण शांततेत असाच एक मिनिट जातो. डॉक्टर स्वतःच्या खिशातून आगपेटी काढून काडी पेटवतो.
'थोडं थांबा, डॉक्टर. आलेच मी. ' असं म्हणत पेलागिया झोपडी बाहेर धावते आणि थोड्या वेळाने एक छोटी पेटवलेली मेणबत्ती घेऊन परत येते.
मेणबत्तीच्या धुकट प्रकाशात डॉक्टरला दिसते की येफिमचे गाल थंडीने गुलाबी पडले आहेत, त्याचे डोळे चमकत आहेत. त्याच्या नजरे मध्ये एक विलक्षण धार आहे; जणू तो डॉक्टर व झोपडीच्या आरपार कुठेतरी पहात आहे.
'काय त्रास होतोय? कसला विचार करतोयस? ' येफिमच्या तोंडाजवळ झुकून डॉक्टर म्हणतो, 'असं खूप दिवसापासून होतयं का? '
'कुठं काय ? माझं मरण जवळ आलयं साहेब. जिवंत माणसांच्यात आता मी राहू शकत नाही.' कसंबसं येफिम बोलला.
' नको ती बडबड करू नकोस. तुला आपण बरं करू.'
'तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं, साहेब. तुमचे खूप खूप आभार मानतो आम्ही. पण आमची समजूत एवढीच आहे की जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा तो येतोच! '
थोडा वेळ येफिमची तपासणी पूर्ण करून डॉक्टर तिथून उठतो आणि त्याला सांगतो, 'मी इथे आता जास्त काही करू शकत नाही. तुला हॉस्पिटलला जायला लागेल. तिथे तुझ्यावर ऑपरेशन करतील. आत्ताच जायला हवं..लगेच जा, वेळ न दवडता. आता तसा बराच उशीर झाला आहे, सर्वजण झोपले असतील, पण काही चिंता नाही. मी तुला चिठ्ठी लिहून देतो. ऐकतोस का?'
'पण साहेब त्यांना हॉस्पिटलला न्यायची सोय काय? पेलागियाने विचारलं, 'आमच्याकडे घोडागाडी नाहीये.'
'ठीक आहे. मी तुझ्या मालकाला विनंती करतो. ते देतील तुम्हाला गाडी.'
डॉक्टर निघून जातो. मेणबत्ती विझते. आणि पुन्हा बू बू बू कहणनं कानावर पडू लागतं. अर्ध्या एक घंट्यानंतर एक बग्गी झोपडीच्या दारात येऊन थांबते. मालकाने डॉक्टरच्या सांगण्यावरून येफिमला हॉस्पिटलला नेण्यासाठी एक छोटी घोडागाडी पाठवलेली असते. येफिम कसबसं बळ एकवटून उठतो आणि जुजबी आवरून गाडीत बसून निघून जातो...
स्वच्छ लखलखीत सूर्यप्रकाशाची सकाळ उजाडते. पेलागिया घरी नाहीये. येफिमचा उपचार कसा चाललाय हे पाहण्यासाठी ती हॉस्पिटलला गेलीय. कुठेतरी दूरवर लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतोय. वार्का लक्ष देऊन ऐकते. कोणीतरी तिच्याच आवाजात गात आहे.
'बायु बायुश्की बायु,
आ या पेसिन्कु स्पोयु.'
पेलागिया घरी परत येते. तिचा चेहरा भकास आहे. मेरीच्या आयकॉन समोर क्रॉसची खूण करून हलक्या आवाजात ती म्हणते,
'रात्री त्याच्यावर बरेच उपचार करण्यात आले ,पण पहाटे त्याने जीव सोडला. त्याला शांती मिळो. ते सांगत होते की यायला थोडा वेळ केला त्याने. थोडसं अगोदर यायला हवं होतं.'
बाप मेल्याचं ऐकताच वार्का पळतच घराबाहेर रस्त्यावर जाऊन रडू लागते. तेवढ्यात तिच्या मानेवर पाठीमागून कोणीतरी इतक्या जोरात फटका मारतो की तिचं कपाळ समोरील बर्च झाडाला जाऊन आपटतं. मान वर करून ती पाहते, तिचा मालक तिच्या समोर उभा असतो.
'अगं ए चिचुंद्री तोंडाचे..' तो खेकसला, 'ते मूल रडतयं कधीपासून नि तू झोपा काढतेयसं?'
त्याने जोरात तिचे कान पिरगाळले. त्यासरशी वार्काने डोकं हलवलं आणि ती पाळण्यातील मुलाला हलवू लागली. तिने अंगाईगीत गीत मोठ्या आवाजात गायला सुरुवात केली. मगाचा तो मोठ्ठा हिरवा ठिपका आणि कपड्यांच्या लंबुळक्या सावल्या यांचं नृत्य पुन्हा सुरू झालं.त्यांनी तिला खुणवलं आणि थोड्या वेळात पुन्हा एकदा तिच्या मेंदूचा कब्जा त्यांनी घेतला. परत ती बिलबिलीत चिखलाने भरलेल्या त्या मोठ्या रस्त्यावर उभी आहे. पाठीवर गाठोडी व पायाखाली सावल्या घेऊन चालणारे ते मगाचे लोक रस्त्यावर गाढ झोपी गेले आहेत. त्यांच्याकडे पाहताच वार्काच्या मनात देखील झोपण्याची उत्कंठा इच्छा निर्माण होते.या क्षणी तिला मनसोक्त झोपायला आवडलं असतं. पण तिची आई पेलागिया तिच्या सोबत चालत आहे. तिला ती भरभर चालवत पुढे पुढे ढकलत आहे. शहरात जाऊन काहीतरी काम मिळवण्यासाठी ते घाई करत आहेत.
'ख्रिस्ताखातिर काहीतरी दया करा साहेब.' रस्त्यात भेटणाऱ्या माणसांकडे ती भिक मागत आहे. 'नेकदिल माणसांनो आम्हाला देवा खातीर थोडी मदत करा.'
'बाळाला माझ्याकडे दे.' ओळखीचा रागीट आवाज वार्काच्या कानावर पडला. 'बाळाला ईकडे दे.' तोच आवाज पुन्हा ऐकू आला. यावेळी त्यातील संताप वाढला होता. 'ऐकतेस काय, कुत्रे!'
वार्का भानावर येऊन पटकन उभी राहिली. आजूबाजूला बघितल्यावर तिला परिस्थितीची जाण झाली. तिच्यासमोर कुठेही तो मोठ्ठा रस्ता नव्हता की आई पेलागिया नव्हती की रस्त्यावरील ती माणसं देखील नव्हती. खोलीच्या मध्यभागी उभी होती ती तिची मालकीण ,जी बाळाला पाजण्यासाठी तिथे आली होती. मजबूत बांध्याची, लठ्ठ मालकीणबाई स्वतःच्या मुलाला दूध पाजवून शांत करतेय तोपर्यंत वार्का त्यांच्याकडे पाहत स्थिर उभी होती. खिडकीबाहेर आकाश निळं व्हायला लागलं होतं, छतावरील हिरवा ठिपका आणि लंबुळक्या सावल्या आता हळूहळू अंधुक होत होत्या. थोड्याच वेळात सकाळ होणार होती.
'बाळाला घे.' चोळीची बटणे लावत तिची मालकीण बोलली, 'खुप रडतोय तो आज. कुणाची तरी नजर लागली असणार त्याला.'
वार्काने मुलाला घेतलं, त्याला हलकेच पाळण्यात झोपवुन ती पुन्हा पाळणा हलवू लागली. मोठ्ठा हिरवा ठिपका आणि लंबुळक्या सावल्या हळूहळू पूर्णपणे लुप्त झाल्या; तिच्या डोक्यावर बसून मेंदूचा कब्जा मिळवणारं आता तिथं काहीच उरलं नव्हतं. परंतु, पूर्वीसारखी डोळ्यातील झोप काही केल्या जात नव्हती. वार्काला झोपायचं होतं.अगदी मेलेल्या माणसासारखं शांत,निपचित झोपायचं होतं. बास्स! बाकी काही नको होतं तिला. तिने पाळण्याच्या काठावर डोकं टेकवलं आणि दोन्ही हातांनी पूर्ण ताकतीनिशी पाळणा हलवू लागली की जेणेकरून डोळ्यातील झोप झोक्यांमुळे तरी पळून जावी. पण काही फायदा झाला नाही. जणू खळ लावून चिकटवल्या सारखं तिच्या पापण्या आपोआप मिटत होत्या; डोकं अधिकच जड झालं होतं.
'वार्का, चल, चूल पेटव!' तिला दरवाजातून मालकाचा तोच आवाज ऐकू आला.
वार्काला कळलं की आता उठून कामाला लागायची वेळ झालीये. पाळण्यात बाळाला सोडून ती तसचं जळण आणण्यासाठी घराबाहेरील शेडकडे पळाली. तिला थोडं बरं वाटलं ,कारण एकसारखं बसून राहण्याने तिला झोप आवरणं अवघड जात होतं. तेच जर तुम्ही काही काम करत असता, इकडे तिकडे धावाधाव करत असता तेव्हा झोपेची इच्छा तितकी प्रबळ राहत नाही. मनोमन असा विचार करत तिनं लाकडं आणून चूल पेटवली. चुलीपाशी बसल्यावर तिला जाणवलं की रात्रभर भरीव लाकडासारखा बधीर झालेला तिचा चेहर्यात आता कुठे संवेदना परत येत आहेत. तिचे विचार धुंदीतून बाहेर येऊन स्वच्छ, स्पष्ट होत होते.
'वार्का, समवार चालू कर. ' वार्काची मालकीन ओरडली. वार्काने लाकडाचा एक ओडंका फोडला व समवारमध्ये घातला. दुसरी छोटी काटकी चुलीवर पेटवून ती समवारमध्ये टाकली, तोच तिला तिसरी आज्ञा ऐकू आली.
'वार्का, मालकांचे बूट साफ कर.'
वार्का ओटीतील जमिनीवर बसली आणि मालकांचे गमबूट साफ करू लागली. बूटपॉलिश करता करता तिला वाटलं की या मोठ्या गमबूटात डोकं खुपसून थोडीशी झोप घेता आली असती तर किती छान झालं असतं.... आणि अचानक ते गमबूट फुगून आकाराने मोठ्ठे होऊ लागतात, त्यांचा आकार पूर्ण खोली इतका होतो. वार्काने हातातील ब्रश खाली टाकला, पण तोच दुसऱ्याच क्षणाला तिने मानेला झटका देऊन डोळे ताणवले. डोळ्यांसमोरील वस्तू मोठ्या होऊन त्यांनी हालचाल करू नये म्हणून ती अतोनात प्रयत्न करु लागली.
'वार्का घराच्या पायऱ्या धुऊन स्वच्छ कर. पाहुण्यांनी अशा घाणीतून घरात प्रवेश करायचा काय?'
वार्काने दरवाजातील पायऱ्या धुऊन साफ केल्या. मग घरातील फरशी धुऊन काढून सर्व खोल्या झाडलोट करून साफसुतर्या करुन घेतल्या. मग स्वयंपाकखोलीत जाऊन तिने दुसरी चूल पेटवली. तिला असंख्य कामे होती अजूनही. त्यामुळे एक मोकळा क्षण देखील तिला मिळत नव्हता.
पण सर्वात कठीण काम होतं ते म्हणजे किचनमध्ये टेबलापाशी एकाच ठिकाणी उभं राहून बटाटे सोलणं. तिचं डोकं टेबलावर झुकू लागलं, हातातील बटाटा डोळ्यांसमोर नाचू लागला. त्यातच तिच्या हातातील चाकु खाली पडला. तिची जाडी, रागीट मालकिन त्याचवेळी तिथून कोणावर तरी खेकसत दुसर्या खोलीत जात होती. तिचा आवाज वार्काच्या कानात तोफेच्या गोळ्यांसारखा घुमत होता. दुपारच्या जेवणावेळी मालकाच्या टेबलापाशी त्यांचं जेवण संपण्याची वाट बघणं, नंतर भांडी धुणं व त्यानंतर फाटलेले कपडे शिवणं हे सर्वकाही देखील वार्कासाठी तितकचं वेदनादायी होतं. बऱ्याचदा तिला असं वाटलं की सगळं काही हातातील आहे तसंच सोडावं आणि आहे त्या जागी जमिनीवर कोसळावं नि छान झोपी जावं.
बाहेर दिवस मावळत होता.खिडक्यांमधून बाहेर अंधार पडत असल्याचं पाहून वार्काने दोन्ही हाताने स्वतःचा चेहरा चाचपला. तिला तो अजूनही लाकडासारखा भासला. का कोणास ठाऊक ती हलकेच हसली. प्रचंड झोप साठवलेल्या तिच्या डोळ्यांना खिडकीतून येणाऱ्या संधीप्रकाशाने हळुवारपणे कुरवाळत तिला गाढ झोपेची शाश्वती दिली जणू... संध्याकाळी मालकाकडे घरी पाहुणे आले.
'वार्का, समवार चालू कर.' मालकीण ओरडली.
मालकाच्या घरातील समवार हा तसा लहानच होता. त्यामुळे पाहुण्यांचा चहापान पूर्ण होण्यासाठी वार्काला पाच सहा वेळा समवार पेटवावा लागला. चहा झाल्यानंतर तिला पाहुण्यांकडे पाहत पुढच्या हुकुमाची वाट बघत तासभर ताटकळत एका जागेवर उभं राहावं लागलं.
'वार्का, पळत जाऊन बीयरच्या तीन बाटल्या आण.'
बिचारी झटकन जागेवरून हलली व चपळाईने पळत सुटली; तिला झोपेला पळवून लावायचं होतं.
'वार्का, थोडा वोडका घेऊन ये!' वार्का ओपनर कुठे आहे? वार्का मासा धुऊन साफ कर.'
आणि शेवटी पाहुण्यांनी निरोप घेतला. मध्यरात्र झाली होती. घरातील दिवे मावळले गेलेत. मालक-मालकिण झोपायला त्यांच्या खोलीत गेलेत.
'वार्का, बाळाला हलव.' तिला शेवटची आज्ञा ऐकू आली.
चुलीपाशी रातकिडे किरकिर करू लागलेत. छतावरील हिरव्या ठिपक्यांनी आणि दोरीवरच्या कपड्यांच्या लंबुळक्या सावल्यांनी वार्काच्या अर्धगुंगीत असलेल्या डोळ्यांवर पुन्हा एकदा आक्रमण केलं. त्यांनी तिला चिडवुन दाखवलं, तिच्या मेंदूचा ताबा घेतला, तिची दृष्टी अंधुक बनविली.
'बायु बायुश्की बायु..' तिने अंगाई गीत गुणगुणायला सुरुवात केली.
पाळण्यातील मुल जोरजोरात रडू लागलं. बराच वेळ रडल्यानंतर त्याचा आवाज क्षीण झाला. वार्काला पुन्हा तोच चिखलभरा रस्ता, पाठीवर गाठोडी मारून निघालेली माणसे, आई पेलागिया, बाप येफिम- सगळं काही दिसू लागलं.
तिला सर्व काही कळत होतं; सर्वांना ती ओळखू शकत होती. पण अजूनही एक रहस्य तिला उमगत नव्हतं. तिला अक्षरशः हातापायांनी बांधून ठेवणारी, तिच्या डोक्यावर भार देऊन तिच्या जगण्यात अडथळा आणणारी ती अदृश्य शक्ती कोणती होती बरे? तिने अवतीभवती पाहिलं. तिला त्या शक्तीचा शोध घेवून तिच्यापासून स्वतःची सुटका करून घ्यायची होती. काय होतं ते ? ती डोक्याला ताण देऊन विचार करू लागली, पण तिला ते सापडत मात्र नव्हतं. शेवटी वेदना असह्य होऊन तिने सर्व ताकद पणाला लावली. डोळे ताणून तिने छतावरील हलणाऱ्या त्या हिरव्या ठिपक्याकडे पाहिलं. कानात प्राण ओतून रडण्याच्या आवाजाला ऐकलं आणि....तिला शेवटी तिचा शत्रू सापडला, जो तिला जगू देत नव्हता.
पाळण्यातील ते मुल तिचं शत्रू बनलं होतं.
ती हसली. तिला गंमत वाटली की इतकी लहान गोष्ट तिच्या या पूर्वी कशी लक्षात आली नाही बरे? छतावरील हिरवा ठिपका, लंबुळक्या सावल्या, चुलीपाशी किरकिर करणारा रातकिडा- हेदेखील हसून आश्चर्य व्यक्त करतायेत असं तिला वाटलं.
झोपेच्या गुंगीने वार्काच्या मेंदूची, मनाची आणि विचार करण्याच्या कुवतीची पूर्ण पकड घेतली होती. स्टूलवरून उठून ती खोलीमध्ये फेऱ्या मारू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य होतं. तिला बांधून ठेवणाऱ्या, जगण्यात अडथळा आणणाऱ्या त्या मुलापासून स्वतःची एकदाची सुटका होणार या विचाराने ती मनोमन सुखावली होती... मुलाला मारायचं आणि मग....झोप....गाढ, समाधानाची झोप...
मोठ्याने हसत, त्या हिरव्या ठिपक्याकडे हात हलवित, डोळे मिचकावत वार्का चोरट्या पावलांनी पाळण्याजवळ गेली व मुलाकडे झुकली. त्या बाळाचा गळा दाबून झाल्यानंतर मटकन ती जमिनीवर आडवी झाली. आता आपण निवांत झोपू शकतो याचा आनंद मानीत तिने डोळे मिटले आणि क्षणार्धात तिला एखाद्या मूर्त माणसासारखी निश्चिल झोप लागली होती.
मूळ रशियन कथा : अंतोन चेखव.
©अनुवाद : इर्शाद वडगांवकर


Comments
इर्शादभाई, या अनुवादित कथांचं संकलन केलं असेलच आपण. पुस्तकरूपात आणायचा विचार नक्की करा...👍
आपलं पुस्तक येणार असेल तर एखादी जबाबदारी घ्यायची माझी तयारी आहे.
सदिच्छा...🌹🤝❤️
Nitin
And how can i reply to that as nice or good story !
इर्शाद सर खूप छान अनुवाद केलाय,तुमच्या मुळे रशियन कथा वाचण्यात रस वाढतो♥
त्यामुळे मी आता तुला अशी विनंती करतो की मराठी मध्ये सुध्दा ज्या उत्तम दर्जेदार कथा आहेत त्या तू रशियन भाषेत अनुवाद कराव्यात जेणेकरून रशियन लोकांपर्यंत आपण पोहचू. तुला खूप शुभेच्छा ❤️
मूळ कथा वाचली नाही त्यामुळे अनुवाद कसा झालाय ते सांगता येणार नाही पण कुठेही तुटकपणा वाटला नाही. संपूर्ण गोष्ट वाचेल तशी डोळ्यासमोर घडतेय असं वाटत होतं. Good work