गुन्हेगार - अंतोन चेखव


 गुन्हेगार  (ज्लोयमीश्लेन्नीक ) 
- अंतोन  चेखव 

मॅजिस्ट्रेट साहेबांच्या खोलीत त्यांच्या टेबलासमोर एक अत्यंत हडकुळा, उंचीने बुटका शेतमजुर आरोपी म्हणून उभा होता. त्याचा अंगावर तागापासून बनवलेला  पट्ट्या पट्ट्याचा शेतमजुरांचा कुर्ता होता. पायात विजार.त्याच्या राकट चेहऱ्यावर देवीचे लालसर ठिपके होते. जाड केसाळ भुवयामधुन त्याचे डोळे जवळपास दिसतच नव्हते . कपाळावर आलेल्या केसांच्या पुंजक्यामुळे त्याचा चेहरा आणखीन उग्र व दुर्मुखलेला वाटत होता. अनवाणी पायांनी तो तिथे ताटकळत उभा होता. 
" देनीस ग्रिगोरव!" मॅजिस्ट्रेटने बोलण्यास सुरुवात केली, " थोडं जवळ येऊन उभं राहा आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे. ह्या जूनच्या सात तारखेला सकाळी रेल्वे गार्ड इवान सिम्यानोवने तुला १४१ नंबरच्या लाईनपाशी रेल्वे रुळातील नट काढुन घेताना पकडलं, ज्या नटाच्या साहाय्याने रूळ हा लाइनशी जोडला जातो. हा बघ, हा नट! ह्या नटासोबत इवानने तुला पकडलं. असचं घडलं होतं का?"
आपल्याला काहीही न कळल्यासारखं करत देनीसने प्रतिप्रश्न केला, "काय??"
" इवान सिम्यानोवने जी काही गवाही दिलीय तसचं घडलं होतं का?"
"अं.. होय."
"ठिकाय. आता सांग  हा नट तू का काढलास?"
" काय?"
" तुझं हे काय काय करणं सोडून गप्प मी विचारलेल्या प्रश्नांची सरळ उत्तरे दे! तो नट तू का काढलास?"
" मला जर त्याची गरज पडली नसती तर काढलाच नसता." छताकडे बघत बेफिकिरीने देनीस बोलला. 
" तुला कोणत्या कारणासाठी त्या नटाची गरज भासली बरं ?"
" नट? आम्ही असल्या नटांपासुन मासे पकडण्यासाठी लागणारे लोड तयार करतो."
" आम्ही! आम्ही कोण?"
" आम्ही, लोकं.... म्हणजे क्लिमोवा गावातली शेतमजूर लोकं."
" हे बघ देनीस, मूर्खाच ढोंग करु नकोस, स्पष्ट सांग खरं खरं! लोड न  माश्याबद्दल खोटंनाट सांगण्याचं काही कारण नाही."
" जन्मापासून कधी खोटं बोललेलो नाही, आणि इथे बोलुन कशाला  वाईट होवू!" डोळे मिचकावत देनीस पुटपुटला, " मला सांगा साहेब, लोड शिवाय मासे धरता येतील का कधी? एखादं गांडूळ किंवा किडा गळाला लावला व तो पाण्यात सोडला तर काहीतरी वजनाशिवाय तो खाली तळाला जाईल का? खोटं बोलतोय म्हणे!"  देनीस कुत्सितपणे हसला, " जर ते गांडूळ पाण्यावर वरच्यावर तरंगायला लागलं तर त्याचा काय फायदा? मोट्ठी मासे पाण्याच्या तळाशी असतात. वरच्या पाण्याला फक्त शिलिसीपेर सारखी लहान मासे हाताला लागतात, आणि ते सुद्धा दुर्मिळ. आमच्या नदीत शिलिसीपेर नाहीत बघा साहेब. त्या माश्याला मोट्ठ्या पात्राच्या नद्या लागत्यात ."

“अरे पण तू मला शिलिसपर्सबद्दल का सांगत आहेस?”
“का? तुम्हीच तर विचारलं होतं! मोठी माणसे सुद्धा आमच्या येथे असेच मासे पकडतात. लहानातल लहान मूल पण लोड शिवाय मासे पकडायला जाणार नाही. आता मासेमारी मधलं ज्याला  काहीच समजत नाही असा एखादा बेअक्कली लोड शिवाय जाईल नदीवर .मूर्खाला कायदे लागू होत नाहीत!
“म्हणजे तुझ्या म्हणन्या प्रमाणे तू मासेमारीसाठी, लोड तयार करण्यासाठी रूळातून  नट काढलास, असंच ना?”
“मग कशासाठी काढला? छिनी दांडू खेळायला?”
“पण तु लोड तयार करण्यासाठी दुसरं काहीतरी घेऊ शकला असतास ना, एखादा जुना स्क्रू ,मोळा किंवा लोखंडाचा तुकडा वगैरे?”
“स्क्रू रस्त्यावर पडलेले मिळत नाहीत, विकत घ्यायला लागतात आणि  मोळ्यांचा फारसा उपयोग होत नाही. नटांपेक्षा उपयोगी दुसर काही नाही. ते वजनाने जड असतात वरती त्याला भोक देखील असतं.”
“अजून सुद्धा मूर्खाच ढोंग करतोयस, अस की  जणूकाही कालच जन्मला या पृथ्वीवर किंवा आकाशातून पडलाय सरळ! तुला समजत नाही का मूर्ख माणसा नट काढल्यामुळे काय होईल ते ? रेल्वे गार्डने  बघितलं नसतं तर रेल्वे रुळावरुन घसरली असती , कितीतरी निष्पाप लोक मारले गेले असते, समजतय का तुला तुझ्या मूर्खपणापायी  लोकं  दगावली असती.”
“देवा रे ! साहेब, मी लोकांना का मारू?? आम्ही काही डाकू लुटेरे आहोत का?  देवाची कृपा की आम्ही आतापर्यंत सरळ मार्गाने जगत आलोय, कधी कुणाला मारलं नाही. साधा असला विचार सुद्धा कधी मनाला शिवला नाही.  देवा, वाचव रे, मेहरबानी कर!  साहेब, काय बोलता तुम्ही हे ?”
“मग मला एक सांग हे रेल्वेचे अपघात का घडतात? दोन-तीन नट रूळातून काढून बघ,  झालाच अपघात !”
देनिस कसंचस हसला व डोळे मोठे करून आश्चर्याने मॅजिस्ट्रेट कडे बघू लागला.
“डोक्यात घे जरा, या नटांच्या सहाय्याने रेल्वे रुळ  लाईन्सला जोडले जातात.”
“मान्य आहे साहेब, आम्हाला ते समजतं…. आम्ही काय सगळेच नट काढून घेत नाही. थोडे शिल्लक ठेवतो हा. डोकं घरी ठेवून काय काम करत नाही. समजतं  आम्हाला.”  जांभळी देऊन देनिसने उजव्या हाताने क्रॉस ची खुण केली.
“गेल्या वर्षी इथे एक रेल्वे रुळावरून घसरली होती,” मॅजिस्ट्रेट सांगू लागला,  “आत्ता समजलं, त्याचं काय कारण होतं..”
“काय म्हणालात साहेब?”
“म्हटलं की आत्ता मला समजलं मागच्या वर्षी झालेल्या रेल्वे अपघाताचं कारण काय होतं. सगळं स्पष्ट आहे .” एवढ  बोलुन  मॅजिस्ट्रेट टेबलावरील कागदावर पेनाने भरभर काहीतरी लिहू लागला.
“साहेब,  तुम्ही शिकली सवरलेली लोक त्यासाठीच तर आहात! तुम्हाला सगळं समजतं. कोणाला बुद्धी द्यायची ते देवाला चांगलं ठाऊक होतं. इथं कसं  तुम्ही सुज्ञपणे सगळं समजून घेऊन फैसला करत आहात- पण तो रेल्वे गार्ड, आमच्यातलाच एक शेतमजूर, पण काही समजून न घेता  सरळ कॉलरला धरून ओढून नेतो. अरे पहिला बघ नीट व मग ओढ ना!  आमच्यात एक म्हण आहे साहेब जिचा  अर्थ आहे  एका शेतमजुराला दुसऱ्याएवढीच अक्कल …अजून एक लिहा साहेब,  त्या गार्डने दोनदा मला दातांवर ठोसा मारला व छातीवर एकदा.”
“जेव्हा तुझ्या घराची झडती घेण्यात आली तेव्हा आणखी एक नट सापडला.  तो तू कधी व कोठून काढलास ?”
“तुम्ही लाल पेटी खाली असलेल्या  नटाबद्दल बोलताय का?”
“तो लाल पेटीखाली होता का दुसरीकडे कुठे मला ठाऊक नाही. तुझ्याकडे तो सापडला हे महत्वाचं. कधी काढलास तू तो नट?”
“मी तो काढलाच नाही. खरंतर तो मला इग्नाष्काने  दिला होता. इग्नाष्का म्हणजे  त्या तिरळस डोळ्यांचा सिम्योनचा मुलगा. अर्थात  मी  हे त्या लाल पेटीखाली असलेल्या नटाबद्दल  बोलतोय साहेब. पण माझ्या अंगणामधील स्लेजगाडीतला नट मी मित्रफान दोघांनी मिळून काढला होता.”
“कोण मित्रफान?”
“मित्रफान  पेत्राव. ऐकलं नाही का त्याच्याबद्दल कधी?  आमच्या गावात तो मासेमारीसाठी लागणारी जाळी बनवतो व विकतो. त्याला असले भरपूर नट लागतात.  एका जाळीसाठी किमान दहा तरी त्याला लागत असावेत.”
“जरा ऐक.. पिनल कोड कलम १०८१त  म्हटलं आहे की रेल्वे लाईन ला जर कोणी हेतुपूर्वक इजा पोहोचवली  असेल आणि अशा  इजेमुळे जर त्या लाईनवरील रेल्वे वाहतूक धोक्यात आली असेल किंवा अपघातास कारणीभूत ठरली असेल आणि दोषी व्यक्तीला हे अगोदर ज्ञात  असेल की त्या इजेमुळे किंवा नुकसानामुळे अपघात होऊ शकतो तर अशा स्थितीत दोषी व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते आणि तुला हे माहित होतं! नट काढल्यामुळे अपघात होऊ शकतो हे तुला माहीत नसणं शक्यच नाही!!”
“खरंय, तुम्हांना त्यातलं अधिक समजतं साहेब. आम्ही अडाणी माणसं. आम्हाला काय समजणार?”
“तुला सगळं चांगलं कळतं !  खोटं बोलतेस तू; ढोंग करतोयस न समजण्याच !”
“कशाला खोटं बोलू साहेब ?  गावात विचारा कोणालाहि  जर तुम्हाला पटत नसेल तर ..लोड न लावता फक्त कालुगा  मासा पकडू शकता आणि तोसुद्धा आस्पपेक्षा चवीला इतका चांगला नसतो आणि  स्टरलेटसुद्धा लोड लावल्याशिवाय  गळाला लागत नाही.”
“अरे तू पुन्हा सुरू झाला त्या  माश्यांबद्दल!” गालातल्या गालात हसत मॅजिस्ट्रेट बोलला.
“शिलिसीपेर मासे आमच्या नदीत नाहीत. कधीकधी  लोडशिवाय तसाच गळ आम्ही पाण्यात टाकतो एखादं  फुलपाखरु लावून. एखादा लहान मासा लागला तर लागला नाही तर नाही.”
“चूप !!तोंड आवर !”  मोठ्या आवाजात मॅजिस्ट्रेट किंचाळला. खोलीत शांतता पसरली. देनिस उतावीळपणे उजव्या पायावरून डाव्या पायावर भर देऊन परत उजव्या पायावर भार देऊन चुळबूळ करू लागला. मॅजिस्ट्रेटच्या टेबलावरील हिरव्या कापडा कडे बघून डोळे मिचकावून लागला -  जणू ते कापड नसून तळपता सूर्य असल्यासारख. मॅजिस्ट्रेट भराभर लिहीत होता.
“साहेब, मी जाऊ शकतो काय?”  न रहावुन देनिसने विचारलं.
“नाही. मला तुला अटक करवून घेऊन तुरुंगात पाठवाव लागेल.”
देनिसने डोळे मिचकवायचं थांबवलं.  स्वतःच्या जाडजूड केसाळ भुवया उंचावून, त्यांचा वक्र करून शंकेने मॅजिस्ट्रेट कडे पाहिलं
“तुरुंगात म्हणजे कसं?  मॅजिस्ट्रेट साहेब, मला त्यासाठी वेळ नाही अजिबात. आज मला जत्रेत  गेलंच पाहिजे,  इगोर कडून  मेणविक्रीचे तीन रुबल्स त्याच्याकडून वसूल केले पाहिजेत.”
“शांत उभा रहा. मला अडथळा आणू नकोस.”
“तुरुंगात ! जर मी काही वाईट केलं असतं तर गेलो पण असतो नक्की! पण  काय कारण आहे, चोरी केली नाही की कोणाशी मारामारी केलेली नाही. हा, साहेब जर तुम्हाला जर माझ्या  देणीबद्दल शंका येत असेल तर त्या म्हातार्‍याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. गावातील कुठल्याही सभ्य माणसाला तुम्ही स्वता विचारा… तो क्रॉस सुद्धा घालत नाही गळ्यात…तो..”
“चूप !”
“हा मी शांत राहतो.” देनिस पुटपुटला, “ त्या म्हाताऱ्याने अकाउंट बुक मध्ये खोट्या नोंदी दाखवल्या आहेत. शपथेवर सांगतो अगदी !  आम्ही तीन भावंडे आहोत - कुज्मा ग्रिगोरेव,  नंतर  इगोर ग्रिगोरेव व मी देनिस ग्रिगोरेव..”
“तू मला काम करू देत नाहीयेस.  ए सिम्योन..!”  मॅजिस्ट्रेट ओरडला. “ह्याला घेऊन जा.”
‘आम्ही तीन भावंडं आहोत.”  देनिस रडकुंडीला आला होता, दोन पहारेकरी खोलीत आले व त्याला ओढत बाहेर नेवू लागले. “ एक भाऊ करणार व दुसरा भाऊ फेडणार -  हा कुठला न्याय ?  कुज्मा  पैसे बुडवणार  व तुम्ही देनिसला पकडणार . न्याय  करणाऱ्यांनो, आमचे जनरल साहेब असते तर त्यांनी बरोबर दाखवलं असतं  तुम्हांना. वारले बिचारे . देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो ! शहाणपणाने न्याय-निवाडा करायचा असतो. असं नसतं करायचं. साहेब, फटके मारा पण ज्याने गुन्हा केलाय त्याला, शिक्षा करा पण डोकं वापरून…”

मूळ रशियन लेखक - अंतोन चेखव
©अनुवाद - इर्शाद वडगांवकर
रशियन भाषा विद्यार्थी, 
irshadruss@gmail.com
७०२०८८७३५२

Comments

Unknown said…
It's amazing story, based on today's reality
Pavan Rajhans said…
This happens even today and yet nobody cares about justice. Great story Irshad

Popular posts from this blog

आणि मार्क्स रशियात पोहोचतो..

Words matter!

'You will never learn the language...