जगणं थांबवायचं नाही, वाटा सापडत जातील...
( २०२२)
गेल्या वर्षी याच दिवशी मला Covid झाल्याचं स्पष्ट झालं. टेस्ट केली आणि ती पॉझिटिव आली. बोरिया बिस्तर गुंडाळून तसाच आपल्या विद्यापीठाच्या D.O.T च्या बिल्डिंग मध्ये असणाऱ्या Covid सेंटर ला गेलो. दहा दिवस तिथे उपचार घेत होतो. माझा covid तसा माईल्ड स्वरूपाचा होता. पण त्या दहा दिवसां दरम्यान मला मनाला थोडी शांतता लाभली. स्वतःच्या भविष्याबद्दल विचार करण्यासाठी निवांत वेळ मिळाला . त्या दहा दिवसांच्या दरम्यान बराच काळ मला पुढच्या चार-पाच वर्षात माझं आयुष्य कसं असेल हाच प्रश्न सतावत होता. कारण मी ज्या विषयात मास्टर्स करत होतो ते अजून पूर्ण झालं नव्हतं आणि मला भिती वाटत होती की कदाचीत ते पूर्ण होईल की नाही. ज्या प्रोजेक्टवर काम केलं होतं त्याचं देखील माझ्याकडून रेंगाळलं होतं ते कधी पूर्ण होईल की नाही ही देखील शंका वाटु लागली होती. वैयक्तिक- कौटुंबिक जीवनात देखील बरारासा उलटफेर झाला होता. ज्या कोवीड सेंटरच्या रूममध्ये छताकडे नजर खिळवुन मी शून्य मनाने तसाच एकटक पाहत राहायचो;बराच वेळ. आयुष्य थांबलं की काय असं वाटायला लागलं होतं. या सर्वांमधून मी कधी बाहेर पडणार की नाही स्वतःला विचारत होतो. माझा वाढदिवस देखील इतर कोवीड रुग्णां सोबत गेला.- लाइन मधुन जेवण घेत घेत. कोवीड ठीक होणार होता याची शाश्वती होती पण आयुष्य ठीक होईल का नाही हे काही समजत नव्हतं...
..... त्यावेळी जर मला कोणी असं सांगितलं असतं की एका वर्षाच्या आत याच दिवशी म्हणजे पुढच्या पाच जूनला तु जे एन यु सारख्या विद्यापीठाचा पीएचडी विद्यार्थी असशील आणि त्या विद्यापीठाच्या कॅम्पस वर नेहरूंच्या पुतळ्यापाशी बसून वाचत बसला असशील तर त्या माणसाला मी नक्कीच खुळ्यात काढून जोरजोरात हसलो असतो. पण या क्षणी मी नेमका तिथेच येवुन ठेपलो आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसवर एका शेडवजा षटकोनी आकाराच्या पॅवेलनमध्ये सिमेंटच्या बाकड्यावर एकटा बसलो आहे. माझ्या पलीकडे जे एन यु च्या ऍडमिनिस्ट्रेशनची काहीसा बसका आकार असलेली मुख्य इमारत आहे. डाव्याबाजूला नेहरूंजींचा पुतळा उन्हात तळपत उभा आहे. ३७ च्या वर तापमान. हवेत प्रचंड उकाडा आहे, तरी मागून येणारी वाऱ्याची हलकीशी झुळूक पण मन प्रसन्न करुन जाते. दर मिनिटाला डोक्यावरून मोठ्या आवाजासहित उडणाऱ्या विमानांचं मला कुतुहल वाटतयं. उजव्या बाजूच्या बागेतील पायवाटेने विद्यार्थी अधून मधून पायी किंवा सायकलने इतक्या उन्हात, डोक्याला काहीतरी गुंडाळुन किंवा हातात छत्री धरून मुख्य ग्रंथालयाच्या दिशेने जाताना दिसतायेत. समोरच्या झाडांवरील पक्ष्यांचा किलबिलाट, माझ्या मागे उभ्या असणाऱ्या झाडावरील एका कावळ्याची कावकाव, कोकिळेची कुहुकुहु आणि रातकिड्यांची किरकिर यांचा एक हवाहवासा वाटणारा सुरेख संगम झालाय. मधूनच एक छोटीशी खारुताई जवळ येऊन माझ्या पायापाशी लुडबडु लागते. एखादं कबूतर पाण्याच्या छोट्या कुंडातील पाणी पिऊन गूटरगू करतो. मी एकवार पुन्हा चोहीकडे नजर फिरवतो आणि या क्षणी निर्मनुष्य भासत असलेल्या या परिसरात देखील जीवन प्रवाही आहे याची मला जाणीव होते. मला हे सुद्धा पटतं की जे प्रश्न कधी संपतील की नाही, ज्या अडचणींवर मी मात करेन की नाही अशी शंका यायची ते सर्व प्रश्न आणि अडचणीना पुरुन उरुन, त्यांना स्पष्टपणे मागे टाकलं आहे. एका वर्षात खरचं जे एन यु सारख्या विद्यापीठापर्यंत धडक मारली आहे आणि माझं एक नवीन शैक्षणिक आयुष्य सुरू झालंय. अलबत, या सर्वांमध्ये मला माझ्या मित्र-मैत्रिणींची आणि शिक्षक वृंदाची झालेली मदत ही माझ्यासाठी डोळे पाणावणारी आहे. इथं यायचचं असं कधी मनी ठरवलं नव्हतं. पण रशियन भाषा आणि साहित्याच्या ओढीने मला जे एन यु च्या प्रवेशद्वारापाशी नेऊन सोडलंय. उदया ६ जुन - रशियन भाषा दिवस! त्याच्या पूर्वसंध्येलाच मी रशियन भाषेचा पीएचडी विद्यार्थी म्हणून इथं पोहोचलो, याची गंमत आणि आनंद देखील वाटतो. या पामराच्या खांद्यावर पडलेल्या जबाबदारीचं भानही डोळ्यासमोर आहेच. २०२१ ला थोडंस लटकलेलं जे आयुष्य थांबलं असं वाटत होतं, पुढं कुठल्या दिशेला सरकेल ही काहूर लागली होती, ते जीवन हे प्रवाही आणि अनप्रेडिटटेबल असल्याची जाण नव्याने मला होतेय. आज वाटणारी अभेद्य परिस्थिती एक ना एक दिवस संपणार आणि उगवणारा सूर्य हा नवा दिवस घेऊन येणार आहे, हे जगण्यातून समजतंय.
नुकत्याच एका पुस्तकात वाचलेल्या ओळी मला आठवतायेत ‘आयुष्याची बहुरूपी विविधता अशी आहे की ते आपल्या पद्धतीने असंख्य वळणे घेत पुढे सरकत राहते व जगणाऱ्या माणसाच्या पावलांना केव्हा कुठली वाट मिळेल हे सांगता येत नाही... ' म्हणूनच स्वतःला सांगतो - जगणं थांबवायचं नाही, वाटा सापडत जातील...
: ईर्शाद वडगांवकर.

Comments